भराव तुटल्याने कार्वे नळ योजनेस धोका; जॅकवेलला 'जलसमाधी'ची शक्‍यता!

अमोल जाधव
Monday, 23 November 2020

कार्वे गावासह परिघामध्ये लोकांना पाणीपुरवठा करण्यास पूर्वीची पाणीयोजना अपुरी ठरत होती. ग्रामपंचायतीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नव्याने पाणीयोजना करण्याबाबत मागणी केली होती. श्री. चव्हाण हे मुख्यमंत्री असताना चार कोटी 79 लाख रुपये खर्चाची शुद्ध नळ पाणी योजना मंजूर झाली. या निधीतून पाणीयोजना पूर्ण झाली आहे.

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कार्वे येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कृष्णा नदीतील जॅकवेलजवळचा मातीचा भराव तुटल्याने धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास सदरच्या जॅकवेलला केव्हाही जलसमाधी मिळू शकते. त्यामुळे लाखो रुपयांची हानी होऊ शकते.

कऱ्हाड तालुक्‍यात सर्वाधिक लोकसंख्येचे गाव म्हणून कार्वे गावाची ओळख आहे. 14 हजार लोकसंख्या असणाऱ्या गावासह सतुकाशी मळा, जाधव मळा, बुलबुल मळा, तुपवाले मळा, थोरात मळा, सिद्धेश्वर मळा, ढोले मळा, चिंगुचा मळा, पाच पांडववस्ती, जुना मळा, आनंद मळा, लोकरेवस्ती, शिंदे मळा, सावंत मळा, बॉंद्रे वस्ती, गोपाळनगर, रेल्वे लाईनची वस्ती, कार्वे चौकी व कोडोली रस्ता वस्ती, तसेच घाडगे पाणंद या ठिकाणांवर गावची लोकसंख्या विस्तारली आहे. गावासह परिघामध्ये लोकांना पाणीपुरवठा करण्यास पूर्वीची पाणीयोजना अपुरी ठरत होती. ग्रामपंचायतीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नव्याने पाणीयोजना करण्याबाबत मागणी केली होती. श्री. चव्हाण हे मुख्यमंत्री असताना चार कोटी 79 लाख रुपये खर्चाची शुद्ध नळ पाणी योजना मंजूर झाली. या निधीतून पाणीयोजना पूर्ण झाली आहे. 

निष्क्रिय सरकारला पदवीधर निवडणुकीत जागा दाखवा; हर्षवर्धन पाटलांचा हल्लाबोल

योजनेतून गावासह 14 किलोमीटर परिघातील ग्रामस्थांपर्यंत पाणी पोचले आहे. योजनेमुळे पाण्याची समस्या सुटली आहे. मात्र, दुसरीकडे योजनेचा जॅकवेल बांधताना संबंधित ठेकेदाराने धोका दिसनूही कार्यवाही केल्याने भविष्यात जॅकवेल कोसळल्यास लाखो रुपयांचा तोटा होणार आहे. या योजनेसाठी पाणी उपसण्यासाठी जवळच्या कृष्णा नदीमध्ये जॅकवेल बांधण्यात आला. त्याठिकाणी गेल्या वर्षी महापुरावेळी नदीच्या बाजूचा मातीचा भराव तुटला आहे. महापुरावेळच्या पाण्याच्या वेगाने जॅकवेलजवळच्या शेतकऱ्याची शेतीही वाहून गेली. त्याबरोबर जॅकवेलजवळचा मातीचा भरावही वाहून गेल्याने जॅकवेल एका बाजूने उघडा पडला आहे. याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास जॅकवेलला केव्हाही जलसमाधी मिळू शकते, हे मात्र नक्की.! 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage To Tap Water Supply Scheme At Karve Satara News