esakal | चक्रीवादळात केळीच्या बागा भुईसपाट; विंग परिसरात 20 लाखांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Banana Orchard

चक्रीवादळात केळीच्या बागा भुईसपाट; विंग परिसरात 20 लाखांचे नुकसान

sakal_logo
By
विलास खबाले

विंग (सातारा) : चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) विंग विभागाला मोठा फटका बसला. तुफान वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. घरांची पडझड झाली. चचेगाव परिसरातील केळीच्या बागा (Banana Orchard) मोडून पडल्या आहेत. हातातोंडाला आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Damage To Banana Orchard Due To Rain In Wing Area Satara News)

विंगसह विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. त्यात वाऱ्याची गती अधिक होती. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. चचेगाव येथील विलास पवार, साहेबराव पवार, हनुमंत हुलवान आदींच्या केळीची बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. केळीची तोडणी करण्याअगोदरच वादळी वाऱ्याने 20 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. पोतलेतील पंतोजी मळ्यात झाड सुभाष जगताप यांच्या घरावर कोसळल्याने नुकसान झाले. तेथील मारुती जगताप व सचिन जगताप यांच्या घरावरील पत्रे उडाले. प्रमिला पाटील यांच्या जनावरांच्या शेडवरील पत्रा उचकटला.

येणके येथे सतीश गरुड यांच्या घराची भिंत कोसळली. अरविंद पवार व शिवाजी कणसे यांच्या घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले. येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात चिंचेचे झाड उन्मळून इमारतीवर पडले. फांद्यांचा डोलारा छतावर अडकल्याने नुकसान टळले. महसूल विभागाने संबंधिताचे नुकसानीचे पंचनामे केले आहेत. वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने विंगसह, घारेवाडी, पोतले, येणके आदी गावठाणातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा पूर्ववत केला.

VIDEO पाहा : तौक्ते चक्रीवादळाची महाबळेश्वरला धडक; मुसळधार पावसात घरं, शाळांची पडझड

Tauktae Cyclone : अंबवडेत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; नुकसान होऊनही पंचनामे नाहीत!

Damage To Banana Orchard Due To Rain In Wing Area Satara News

loading image