‘क्लिक’मधील रंग फुलविणारे दत्ता भट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दत्ता भट

‘क्लिक’मधील रंग फुलविणारे दत्ता भट

फोटोंची दुनियाच न्यारी असते. फोटो आयुष्यातील सुंदर क्षण टिपत राहतात. ते कायमस्वरूपी जतन करून ठेवतात. एका जमान्यात फोटोग्राफी हे आव्हान मानले जायचे. अशा परिस्थितीत दत्ता भट यांनी इंदिरा गांधींपासून पु.ल. देशपांडे यांच्‍यापर्यंत कैक दिग्गजांचे फोटो टिपताना आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला.

- सुनील शेडगे

द त्तात्रय शिवराम भट हे खासकरून दत्ता भट या नावानेच अधिक ओळखले जातात. त्यांचा जन्म कऱ्हाडनजीकच्या ओगलेवाडीतील. वडिलांचे निधन झाले तेव्हा ते जेमतेम तीन वर्षांचे होते. धाकटे बंधू मुकुंद हे सहा महिन्यांचे. अशा प्रतिकूल परिस्थितीत आईने मोठ्या जिद्दीने मुलांना वाढविले. दत्ता भट यांचे आरंभीचे शिक्षण आत्माराम विद्यामंदिरात, तर पदवीपर्यंतचे शिक्षण एस. जी. एम, कॉलेज अन् यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजात झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना छायाचित्रणाचा छंद जडला. पुढे १९८० च्या काळात सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या प्रेरणेतून ते कऱ्हाड परिसरात कलर फोटोग्राफी करू लागले. त्या काळात कलर फोटोग्राफी करणारे छायाचित्रकार तसे दुर्मिळच.

किंबहुना साताऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत असे छायाचित्रकार अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच होते. त्यातही फोटोग्राफीत स्वतःच्या कौशल्याचा ‘टच’ देणारे छायाचित्रकार मोजकेच होते. दत्ता भट त्यात अग्रस्थानी होते. अगदी सुरुवातीच्या काळात कऱ्हाडमधील वसंतराव श्रोत्री यांच्याकडून ते दिवसाला आठ आणे किमतीने साधा कॅमेरा भाड्याने घेत. मात्र, त्या कॅमेऱ्यातूनही त्यांचे स्वतःचे कसब फोटोतील जिवंतपणाचा प्रत्यय देत असे. त्यामुळे त्यांच्या फोटोग्राफीचा लौकिक कमी काळातच सर्वदूर पोचला. त्यातूनच त्यांनी भारी किमतीचा जपानी कंपनीचा कॅमेरा खरेदी केला. तोच त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण असल्याचे ते मानतात. नंतरच्या काळात आपल्या संस्मरणीय फोटोग्राफीमुळे ते ओळखले जाऊ लागले.

१९८४ मध्ये ते फोटोग्राफीच्या प्रशिक्षणासाठी पश्चिम जर्मनीत गेले. युक्रेन, रशियासह युरोपमधील वीस देशांचा अभ्यास दौराही त्यांनी केला. पुढे कऱ्हाडमधील एका कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण यांचा गालाला हात लावून बसलेला फोटो त्यांनी अगदी अचूकपणे टिपला. तो जर्मनीतून प्रिंट करून आणला. तोच फोटोनंतर प्रसिद्धीच्या पटावर कायम राहिला. त्याच काळात इंदिरा गांधी, वसंतराव नाईक, बाळसाहेब देसाई, राजारामबापू पाटील यांसारख्या दिग्गजांचे फोटो त्यांनी मोठ्या खुबीने टिपले.

प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, रणजित देसाई यांचे फोटो काढण्याची संधीही त्यांना लाभली. भारताचे राजदूत बॅरिस्टर आप्पासाहेब पंत, किरण बेदी, नीला सत्यनारायण यांच्यापासून खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यापर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष स्नेह त्यांना लाभला.

फोटोग्राफीबरोबरच सामाजिक क्षेत्रातही ते सक्रिय राहिले. कऱ्हाडच्या रोटरी क्लबचे ते ३६ वर्षे सदस्य म्हणून राहिले. काही काळ अध्यक्षपदाची धुराही त्यांनी समर्थपणे पेलली. छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी विविध उपक्रम राबविले.

पुढील पिढीत वारसा

दत्ता भट यांनी आपली फोटोग्राफीची कला पुढील पिढीतही प्रभावीपणे रुजवली आहे. त्यांचे चिरंजीव अवधूत हे नामवंत छायाचित्रकार आहेत.‘कॉमनवेल्थ यूथ गेम’च्या फोटोग्राफीसाठी त्यांची देशातून निवड झाली होती. त्यांनी काढलेल्या छायाचित्राला ‘निकॉन’ या जागतिक कंपनीकडून विविध पारितोषिके मिळाली आहेत.