esakal | पाटणातील जांबाज जवानाची नाईक, हवालदारनंतर 'सुभेदार' पदाला गवसणी
sakal

बोलून बातमी शोधा

Soldier Dattatraya Magar

प्रतिकूल परिस्थितीत यश साध्य करणे हे एक आव्हान असते.

पाटणातील जांबाज जवानाची नाईक, हवालदारनंतर 'सुभेदार' पदाला गवसणी

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (सातारा) : प्रतिकूल परिस्थितीत यश साध्य करणे हे एक आव्हान असते. प्रबळ इच्छाशक्ती अन् प्रचंड प्रयत्न याविना हे यश गवसत नाही. त्याचीच प्रचिती देताना लष्करात कार्यरत असलेल्या दुर्गम भागातील एका जवानाने सुभेदार पदापर्यंत झेप घेतली आहे. दत्तात्रय हणमंतराव मगर (Soldier Dattatraya Magar) हे या जवानाचे नाव. ते पाटण तालुक्यातील (Patan Taluka) ढोरोशी या गावचे सुपुत्र. डोंगराळ भागात वसलेल्या या गावातील कित्येकांनी विविध क्षेत्रांत येथील मातीचे नाव उज्ज्वल केले आहे.

दत्तात्रय मगर हे याच पंक्तीतील. ते सध्या आसाम राज्यात ‘आर्मी सप्लाय कोअर’मध्ये (Army Supply Core) कार्यरत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी मोठ्या धडपडीतून लष्करी सेवेत प्रवेश मिळविला. २००१ मध्ये ते जवान म्हणून सैन्यात दाखल झाले. सुरवातीच्या काळात ते स्टोअर क्लार्क म्हणून रुजू झाले होते. त्यानंतरच्या काळात नाईक, हवालदार, नायब सुभेदार अशा एकेक पायऱ्या यशस्वीपणे पुढे जात त्यांना आता सुभेदारपदी बढती मिळाली आहे.

नोकरीत असताना ते स्वस्थ बसले नाहीत. त्याच काळात त्यांनी आपले उच्चशिक्षणही पूर्ण केले. बंगळूर, दिल्ली, श्रीनगर, झाशी, जोधपूर, हिमाचल प्रदेश, डेहराडून, चेन्नई आदी ठिकाणी त्यांनी भरीवपणे आपली सेवा बजाविली आहे. आपले वडील (कै.) हणमंतराव, आई प्रभावती यांची प्रेरणा अन् स्नेही उद्योजक सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनातून हे यश साध्य झाल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना नमूद केले.

अधिकाधिक तरुणांनी देशसेवेचे व्रत स्वीकारावे अन् या सेवेत सातत्य ठेवावे, देशसेवेचा हा वसा खूपच आनंददायी आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो.

-दत्तात्रय मगर, सुभेदार, ढोरोशी, ता. पाटण

loading image
go to top