मुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

राजेंद्र ननावरे
Saturday, 12 September 2020

जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वारणा कोविड सेंटरमध्ये सर्व सोयी असल्यामुळे रुग्णांना योग्य व तातडीचे उपचार मिळतील. कऱ्हाडच्या मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व सोयींनीयुक्त चांगले रुग्णालय उभे केले आहे. या रुग्णालयाचा सर्व समाजातील लोकांना फायदा होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

मलकापूर (जि. सातारा) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांवर ताण पडत आहे. कऱ्हाडच्या मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व सोयींनीयुक्त चांगले रुग्णालय उभे केले आहे. या रुग्णालयाचा सर्व समाजातील लोकांना फायदा होईल. मुस्लिम समाजाचे राज्यासाठी आदर्शवत उदाहरण असून, त्यांचा आदर्श घेऊन अन्य सामाजिक संस्था पुढे येतील, असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे व्यक्त केला. 

येथील वारणा हॉटेलमधील मुस्लिम समाज संचलित वारणा कोविड सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, मजहर कागदी, फारुख पटवेकर, अल्ताफ शिकलगार, राजू इनामदार, इसाक सवार, रफिक मुल्ला, इफान सय्यद, अरुण तांबोळी, बरकत पटवेकर, मुनीर बागवान, शाहिद बारस्कर, बिलाल पठाण यांच्यासह मुस्लिम समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. 

पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे : अरुण गोडबोले

मंत्री पाटील म्हणाले, "जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वारणा कोविड सेंटरमध्ये सर्व सोयी असल्यामुळे रुग्णांना योग्य व तातडीचे उपचार मिळतील.'' जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, "कोविड सेंटर उभारण्यासाठी मुस्लिम बांधवांची धडपड चांगली आहे. जनतेच्या सोयीसाठी शासनाने सर्वोतोपरी मदत केली. यासाठी इतर संस्थांनी अशा कोविड सेंटरसाठी प्रयत्न करावे. त्यांनाही मदत करू.'' श्री पटवेकर म्हणाले, "हे सेंटर सर्व समाजासाठी खुले असेल. 24 साधे बेड असून, 28 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास 100 रुग्णांसाठीही जागा उपलब्ध होऊ शकेल.'' या वेळी कोरोना योद्‌ध्यांचा सत्कार करण्यात आला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dedication Of Warna Covid Center By Guardian Minister Balasaheb Patil Satara News