
Deepak Kesarkar : हिंदुत्वापासून दुरावलेल्यांना मदतीची गरज; दीपक केसरकर
कऱ्हाड : लोकांनी दिलेल्या युती शासनाच्या विचारांपासून व (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून दूर गेलेल्यांनाच मदतीची गरज आहे, अशी टीका शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला.
कार्यक्रमानिमित्त ते येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानेच पुढे वाटचाल करण्याचा ठाम निश्चय आहे. बाळासाहेबांची इच्छा मोदींनी पूर्ण केली आहे.
युतीच्या विचारांबरोबर, हिंदुत्वाच्या विचारधारेबरोबर राहावे, अशी आम्ही मागणी केली होती; परंतु त्यांनी विचारधारा सोडली. एकच दिवस मला पंतप्रधान करा. ३७० कलम रद्द करतो, असे म्हणणाऱ्या बाळासाहेबांनंतर मोदींनी तो निर्णय घेत कलम रद्द केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अनुद्गार सहन करणार नाही.
दहशतवाद्यांनी रोखल्यानंतर एकही विमान हज यात्रेला जाऊ देणार नाही, असा इशाराही बाळासाहेबांनी देताच वैष्णोदेवीची यात्रा सुरू झाली, ते पूर्ण देशाला माहीत आहे. असे असताना यात्रा काढणारे महाराष्ट्रात येऊन सावरकरांबद्दल अनुद्गार काढतात.
महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही. कोणाबरोबरही युती केली म्हणून जनता बरोबर राहात नाही. जनता विकासाबरोबर आहे. लोकांनी आम्हाला निवडून दिले त्या विचारांच्या विरोधात जात असाल, तर महाराष्ट्राची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. गद्दार, लाचार कोण, ते जनतेला कळेल.
आदित्य ठाकरे वयाने लहान आहेत. त्यांनी राजकारण बघितलेले नाही. स्वतःच्या ऑफिसमध्ये एक महिनाभरही गेलेले नाहीत. वाईट बोलणाऱ्यांना सौम्य भाषेत उत्तर दिले जाईल; पण ते असे असेल, की खरी गद्दारी कुणी केली, पदासाठी कोण लाचार झाले. ते जनता पाहात आहे.