काय सांगता! आर्टिफिशियल झेंडूच्या तोरणांना ग्रामीण भागात मागणी

राजेश पाटील
Sunday, 25 October 2020

अनेक व्यवसायिकांनी ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत अगदी हुबेहूब वाटणाऱ्या कृत्रिम झेंडूच्या फुलांच्या माळा व हार बनवून विक्रीस ठेवल्या असुन मागणीही चांगली आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा) : दसरा- दिवाळीत लागणाऱ्या हार, तोरण व माळांसाठी परिसरातील दुकाने आणि घरातून यंदा झेंडूच्या कृत्रीम फुलांचाच अधिक प्रमाणात वापर होताना दिसणार आहे. झेंडूवरील करप्याचा प्रादुर्भाव, घटलेले क्षेत्र आणि वाढलेले दर यामुळे पुन्हा-पुन्हा वापरता येणाऱ्या झेंडूच्या कलात्मक व आकर्षक कृत्रिम फुलांना ग्रामीण भागातील ग्राहकही पसंती देत असल्याचे चित्र परिसरात सध्या दृष्टीला पडत आहे.

भगव्या आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूचे क्षेत्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात वाढत चालले असून सणासुदीचा अंदाज घेवून अनेक युवा शेतकरी झेंडू लागवडीला प्राधान्य देताना दिसत आहेत. येथे उत्पादीत होणारा झेंडू मुंबई बाजारपेठेतही विक्रीस पाठविण्यात येतो. यावर्षी कोरोनाचा वाढलेला संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी उत्सव साजरे करण्यावर आलेल्या मर्यादा याचा परिणाम झेंडू पिकाखालील क्षेत्रावर झाला. या क्षेत्रात मोठी घट झाल्याचे दिसते आहे.

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा  

सध्या शिवारात असलेल्या झेंडूला हवामान बदल आणि पावसामुळे करप्याने ग्रासले असून बाजारातील चांगल्या फुलांची अनुपलब्धता आणि वाढलेले दर यामुळे अनेकजण कृत्रिम फुले खरेदीला पसंती देताना दिसत आहेत. पूर्वी शहरातील बाजारपेठातून दिसणारी आर्टिफिशल फुलांची गर्दी आता ग्रामीण भागातूनही दृष्टीला पडत आहे. अनेक व्यवसायिकांनी ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत अगदी हुबेहूब वाटणाऱ्या कृत्रिम झेंडूच्या फुलांच्या माळा व हार बनवून विक्रीस ठेवल्या असुन मागणीही चांगली असल्याचे व्यवसायिक अमित पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, 'पुन्हा पुन्हा वापरता येणाऱ्या फुलांच्या माळा, हार, तोरणे यांना ग्राहक पसंती देत आहेत .दरही परवडण्या सारखे आहेत.'

बिहारला महागठबंधन विजयी होईल; काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For artificial Flowers In Rural Areas Satara News