
लक्ष्मी विलास बॅंकेला जो न्याय दिला तोच न्याय कराड जनता बॅंकेला लावावा अन्यथा सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही असा इशारा विवेक ढापरे (सचिव, कराड जनता बॅंक सभासद, ठेवीदार बचाव कृती समिती, कराड) यांनी दिला आहे.
कऱ्हाड : अनेक वर्षांपासूनचे गैरव्यवहार, शासकीय नियमांकडे केलेल्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे कराड जनता बॅंक दिवाळखोरीत गेली. ठेवीदारांचे सगळे पैसे परत मिळेपर्यंत कराड जनता सहकारी बॅंकेचा लढा कायम सुरू ठेवण्याची भूमिका कराड जनता बॅंक सभासद, ठेवीदार बचाव कृती समितीने स्पष्ट केली आहे.
आयुष्याची पै न पै करून साठवलेली पुंजी क्षणार्धात मातीमोल झाली. त्यामुळे अनेक ठेवीदारांनी मृत्यूला कवटाळले, काही जण मनोरुग्ण झाले. चार कर्जदारांकडे 500 कोटींची विनातारण दिलेली कर्जे आहेत. त्यातील एक रुपयाही वसूल होत नाही, अशावेळी ज्यांनी यावर लक्ष ठेऊन कारवाई करायची ती रिझर्व्ह बॅंक, सहकार खाते नेमके करत काय होते, असा गंभीर प्रश्न आहे. केंद्र सरकार अशा नियामक यंत्रणांवर काय कारवाई करणार का, हाही प्रश्न आहे. त्यामुळे त्यासाठीही लढा कायम राहणार आहे. कराड जनता बॅंकेतील दोषींवर न्यायालयाच्या आदेशाने फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षांत त्याचा तपास करण्यास पोलिसांना वेळ नाही, तो त्यांनी तातडीने करावा. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेमध्ये दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बचाव कृती समिती करणार आहे.
समाजहिताची कामे करीत गुण्यागोविंदाने नांदत आहे 30 जणांचे एकत्र कुटुंब!
रिझर्व्ह बॅंक, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्याकडे निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावरही समिती ठाम आहे. ठेवीदारांच्या हिताच्या रक्षणासाठी बॅंक सक्षम बॅंकेत विलीन करावी, यासाठी कृती समिती प्रयत्न करणार आहे. सामान्य जनतेचा बॅंकिंग क्षेत्रावरचा विश्वास वाढेल, सामान्य जनतेच्या ठेवींवरच बॅंकिंग क्षेत्राचा डोलारा उभा आहे, ठेवीदारांचा विश्वास गमावल्यास तो कोसळायला वेळ लागणार नाही. सध्या बाळासाहेब पाटील हे सहकारमंत्री आहेत, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील कराड जनता बॅंक दिवाळखोरीत गेलेली असताना जनतेचे पालक या नात्याने त्यांनी हा प्रश्न सोडवावा, अशी समितीची मागणी आहे, ते नक्की हा प्रश्न सोडवतील, असा समितीला विश्वास आहे.
लक्ष्मी विलास बॅंकेला जो न्याय दिला तोच न्याय कराड जनता बॅंकेला लावावा अन्यथा सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही.
- विवेक ढापरे, सचिव, कराड जनता बॅंक सभासद, ठेवीदार बचाव कृती समिती, कराड.
Edited By : Siddharth Latkar