यशवंतरावांच्या आठवणींना उपमुख्यमंत्र्यांकडून उजाळा!

हेमंत पवार
Wednesday, 25 November 2020

अभिवादनानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण ट्रस्टची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या वस्तुसंग्रहालयास भेट दिली. त्या वेळी त्यांनी ज्येष्ठ नेते चव्हाण यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांना मिळालेल्या भेट वस्तू, पुरस्काराची प्रमाणपत्रे, दुर्मीळ फोटो, हस्तीदंत, हस्तीदंताच्या वस्तू आदींची जवळून पाहणी केली.

कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील प्रीतिसंगमावरील समाधीस अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील वेणुताई चव्हाण स्मृतिसदनास भेट दिली. तेथे ज्येष्ठ नेते चव्हाण, वेणुताई चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या वस्तुसंग्रहालयास भेट दिली. तेथील पाहणी करत काही काळ ते तेथेच रमले. 

ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या येथील समाधीस अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार आज येथे आले होते. अभिवादन केल्यानंतर त्यांनी येथील वेणुताई चव्हाण स्मृतिसदनास भेट दिली. तेथे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण व वेणुताई चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, नगरसेवक सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, प्रशांत यादव, सादिक इनामदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना गाजरं दाखवावी लागतात, अजित पवारांचा विराेधकांना टोला 

अभिवादनानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण ट्रस्टची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या वस्तुसंग्रहालयास भेट दिली. त्या वेळी त्यांनी ज्येष्ठ नेते चव्हाण यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांना मिळालेल्या भेट वस्तू, पुरस्काराची प्रमाणपत्रे, दुर्मीळ फोटो, हस्तीदंत, हस्तीदंताच्या वस्तू आदींची जवळून पाहणी केली. यशवंतराव चव्हाण यांनी वापरलेल्या वस्तू किती मौल्यवान होत्या, त्यांची किंमत काय असू शकेल? यावरही त्यांनी यादरम्यान भाष्य केले. यशवंतराव चव्हाण यांना संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातून विविध ठिकाणांहून मिळालेल्या तलवारींचा संग्रहही वस्तुसंग्रहालयात करण्यात आला आहे. त्याबद्दलही त्यांनी चौकशी केली. यशवंतराव चव्हाण यांच्या विविध वस्तूंचा ठेवा जतन केल्याबद्दल समाधान व्यक्त करत ते काही काळ तेथेच रमले होते. त्यानंतर ते निवेदने स्वीकारून साताऱ्याला रवाना झाले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar Visited The Museum At Karad Satara News