
पालिकेची कोट्यवधींची विकासकामे
सातारा - सातारा पालिकेचा कारभार करत असताना सातारा विकास आघाडीने शहराच्या विकासाला चालना देणारी विकासकामे आणि उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. खासकरून गेल्या दोन वर्षांत साताऱ्यात कोट्यवधींची कामे केली असून त्याचा फायदा सातारकरांना होत आहे. ही कामे मार्गी लागल्याचा मला आनंद असल्याची प्रतिक्रिया खासदार उदयनराजेंनी नोंदवत पालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त सातारकरांना पत्रकाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
पत्रकात म्हटले आहे की, १९८३ मध्ये स्थापना झालेल्या सातारा पालिकेत अनेक मान्यवरांनी पदे भूषविली आहेत. या व्यक्तींनी शहराच्या नावलौकिकात भर घालण्याचे काम केले आहे. सातारा विकास आघाडी तोच विकासरथ पुढे नेत असून त्यातून गेली २० वर्षे आम्ही सातारकरांची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
पालिकेत कार्यरत असताना विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. सातारा पालिकेच्या ६८ कोटी रुपयांच्या नवीन प्रशासकीय इमारत, हद्दवाढ भागातील सुमारे ४० किमीपेक्षा अधिक रस्ते, सुमारे १५ किमीपेक्षा अधिक लांबीची गटर्स, ६०० पेक्षा जास्त पथदिवे, ३ नवीन उद्याने, वाढे फाटा उड्डाणपूल परिसर विकसित करण्याचे कामदेखील हाती घेण्यात आले असून यासाठी ४८ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध आहे. शहरी सुविधांसाठी रस्ते विकास व इतर कामांसाठी नगरोत्थानमधून २१ कोटी ५७ लाख रुपयांच्या ५१ कामांना जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजुरी मिळवलेली आहे.
नागरी दलितेतर योजनेतून ५ कोटी १४ लाखांचा निधी पायाभूत विविध कामांसाठी मिळाला आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत १७ कोटी ४२ लाख रुपयांच्या ६६ कामांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाने मंजूर केले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून राज्य शासनाकडून बॅडमिंटन हॉल, बास्केटबॉल ग्राउंड, रस्ते विकास, ओढ्यांचे बळकटीकरण आदी ३४ कामांसाठी ६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळून ती कामे मार्गी लागली आहेत. मागील सलग दोन वर्षे ‘साविआ’ने अंदाजपत्रकात १ कोटी ८० लाख रुपये राखून ठेवत माजी सैनिकांचे सूचनांनुसार कामे केल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.
दिव्यांगांसाठी गत दोन वर्षांत अंदाजपत्रकात ७४ लाख रुपयांची तरतूद करत त्यातून थेट मदतदेखील केली आहे. नोंदणीकृत फेरीवाले, छोट्या व्यावसायिकांना कोरोना काळातील प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले आहे. शहापूर पंपिंग स्टेशन व जकातवाडी जलशुद्धीकरण केंद्रातील वीजबिल बचतीसाठी सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प सोनगाव कचरा प्रक्रिया केंदात उभारण्यात येत आहे. नगरपरिषद इमारत, पॉवर हाउस, जकातवाडी जलशुद्धीकरण केंद्र, सोनगाव कचरा प्रक्रिया केंद्र, ग्रेड सेपरेटर, स्व.दादामहाराज चौक, वाढेफाटा चौक, पोवई नाका, मोती चौक, गोलबाग परिसरात सीसीटीव्ही उभारण्यात आले आहेत.
चारभिंती तसेच अजिंक्यताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांसाठी पथदिवेदेखील उभारले आहेत. गोडोली तलाव सुशोभीकरणाकरिता अमृत २.० मधून ४ कोटी ७७ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे. कास धरण ते सातारा या मार्गावरील अतिरिक्त पाणीपुरवठा वाहिनीसाठी ८७ कोटी २१ लाखांचा प्रस्ताव केंद्रास सादर करण्यात आला आहे. सांबरवाडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे ७४ लाख खर्चून सुशोभीकरण करण्यात येत आहे. शहापूर, जकातवाडी येथे नवीन पंप बसवणे तसेच तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. पालिकेतील अनुकंपा तत्त्वावरील २३ पात्र उमेदवारांना वारसा हक्काने १५ जणांचीदेखील नियुक्ती करण्यात आल्याचे तसेच ३६ कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी लागू केल्याचेही पत्रकात नमूद आहे.
दोन वर्षांत शहरात १२३ नवीन बचत गट स्थापन केले असून आजअखेर ७०८ बचत गट कार्यरत आहेत. यापैकी ११० गटांना १० हजारांचा फिरता निधी देण्यात आला आहे. २०२१-२२ मध्ये स्वयंरोजगार घटकांतर्गत ५६ जणांना ८७ लाखांचे कर्ज व्यवसायाकरिता बँकांच्या मदतीने वितरण करण्यात आले असून स्वयंरोजगार बचत गट घटकांतर्गंत २ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज वाटण्यात आले आहे. पोवई नाका परिसरात बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात आले असून त्यात सद्य:स्थितीत ३० जणांचे वास्तव्य आहे. याठिकाणी पुरुष, स्त्रियांसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत पालिकेने १ हजार ७०९ छोट्या विक्रेत्यांना शिफारसपत्रे दिली असून १ हजार ९ पथविक्रेत्यांना बँकांमार्फत बीज भांडवलासाठी प्रत्येकी १० हजार कर्ज दिले आहे.
शहरातील ३ हजार ८३१ नवीन मिळकतींची पाहणी, कर आकारणी केल्याने यंदा १८ कोटींपेक्षा जास्त करवसुली झाली असून पर्यावरणपूरक ४३ मिळकतींना करातून सवलत दिली आहे. माजी सैनिकांना सुरू वर्षात ११ लाख ३३ हजारांची कर सूट दिली आहे. लॉकडाउनमध्ये व्यवसाय बंद असलेल्या ६ हजार ६०० व्यावसायिकांना ७१ लाख ५० हजारांची कर सूट दिली आहे. वणवा नियंत्रणासाठी ६ फायर ब्लोअर मशिन व इतर यंत्रणा उभारली आहे. सैनिकी रुग्णालयास आवश्यक सुविधादेखील पुरविल्याचे पत्रकात नमूद आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये पालिकेचा अमृत शहराच्या प्रवर्गात देशात १५ वा तर राज्याच्या माझी वसुंधरा अभियान २.० स्पर्धेत पालिकेने अमृत शहरांच्या प्रवर्गात राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. जन्म-मृत्यू तसेच विवाह नोंदणी विभागाचे अद्ययावतीकरण केले आहे. पालिकेच्या मोकळ्या जागांचे सुशोभीकरण विविध व्यक्ती, संस्थांच्या मदतीने करण्यात येत असून त्याचा कोणताही आर्थिक भार पालिकेवर पडलेला नाही. महादरे तलाव परिसर, दैवज्ञ मंगल कार्यालयाजवळील जागा, शहरातील प्रमुख रस्ता दुभाजक यांचादेखील विकास व्यक्ती, संस्थांकडून करून घेण्यात आला आहे. पालिकेच्या जागेतील फलकांवर जाहिराती उभारण्याच्या ठेक्यातून २० लाखांचा महसूल वाढणार आहे. केंद्राच्या सुकन्या समृध्दी योजनेंतर्गंत प्रतिलाभार्थी रुपये २५० प्रमाणे नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या २३४ मुलींच्या नावाने मुदत ठेव करण्यात येणार असल्याचेही पत्रकात नमूद आहे.
शहराच्या सौंदर्यात भर ः
ग्रेड सेपरेटरचे सुशोभीकरण होत असून त्यामुळे सौंदर्यात भर पडणार आहे. हुतात्मा स्मारक परिसरात हुतात्मा कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान विकसित करण्यात येत असून त्यासाठी १ कोटी ३३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महामार्गावरील स्व.दादामहाराज चौक (बॉम्बे रेस्टॉरंट चौक), वाढे फाटा, अजंठा चौक येथील उड्डाण पुलाखालील जागांचे सुशोभीकरण ६ कोटी ५० लाखांच्या निधीतून होणार आहे. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्ता तसेच सुविधांसाठी १४ कोटी ३० लाखांचा प्रस्ताव असून पहिल्या टप्प्यात ६०० मीटर रस्ता काँक्रिटीकरण व सुशोभीकरण होणार आहे. गत दोन वर्षांत हुतात्मा अशोक कामटे उद्यान, यादोगोपाळ पेठ उद्यान, नालंदानगर उद्यान, मेहेर देशमुख कॉलनी उद्यान, व्यंकटपुरा पेठ उद्यान, मिलिंद हाउसिंग सोसायटी उद्यान तसेच गोडोलीतील जिजाऊ उद्यान सुधारणा कामे होत आहेत.
मुलींसाठी अभ्यासिका ः
समाजकल्याणतर्फे अभ्यासिका बांधणे तसेच जुन्या समाजकल्याण कार्यालयाचे नूतनीकरण करणे, ही कामे करण्यात येणार आहेत. कास धरण क्षेत्रातील रस्ता विकासित करण्याचे काम पालिका करीत असून शहरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा पुस्तकासंह गोडोली आयुर्वेदिक गार्डन येथे दुमजली मागदर्शन केंद्रदेखील उभारण्यात येणार आहे. बुधवार नाका, नालंदानगर, सदाशिव पेठ भाजी मंडई, होलार गल्ली मंगळवार पेठेतील शौचालयाची कामे पूर्ण झाली असून, पोवई नाका व कमानी हौद परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे. केंद्राच्या योजनेंतर्गत शहरात नवीन ६ आरोग्य केंद्रे मंजूर झाली असून, या केंद्रांच्या उभारणीसाठी शाहूपुरी, विलासपूर ग्रामपंचायत इमारत, हुतात्मा स्मारक अग्निशमन केंद्र, सदरबझार अग्निशमन केंद्र, तामजाईनगर समाजमंदिर, लक्ष्मी टेकडी येथे पालिकेने जागा उपलब्ध करून दिली आहे. पालिकेची शतकोत्तर अमृतमहोत्सवी वाटचालीत सातारा विकास आघाडीचे काम निश्चितच नोंद घेण्यासारखे असून त्याचा मला अभिमान असल्याचेही उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
Web Title: Development Works Worth Crores Of Satara Municipality Mp Udayanaraje Bhosale
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..