साताऱ्यात धनगर समाजाचा 'रास्ता रोको'; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

गिरीश चव्हाण
Saturday, 17 October 2020

केंद्र व राज्य सरकारने धनगर समाजाला एसटीचे आरक्षण तत्काळ द्यावे, समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी, आरक्षण लागू केल्यानंतरच केंद्र व राज्य सरकारने भरती करावी, समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना लागू करावी आदी मागण्या धनगर बांधवांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनव्दारे केल्या आहेत.

सातारा : धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करत शुक्रवारी सातारा जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीने अजंठा चौकात महामार्गालगत "रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात भंडारा उधळून आंदोलन करत धनगर बांधवांनी तत्काळ आरक्षण लागू करण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. 

या आंदोलनात प्रवीण काकडे, राजू गोरे, सतीश थोरात, जयराम काळे, मारुती ढेबे, कोंडिबा डोईफोडे, किशोर शिंदे व इतर समाज बांधव सहभागी झाले होते. याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे, की धनगर समाज आरक्षणापासून 73 वर्षे वंचित असून, आरक्षण मिळू नये, यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. 

नवरात्रोत्सवात गरबा, दांडियाला बंदी : जिल्हाधिकारी शेखर सिंह

केंद्र व राज्य सरकारने धनगर समाजाला एसटीचे आरक्षण तत्काळ द्यावे, समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी, आरक्षण लागू केल्यानंतरच केंद्र व राज्य सरकारने भरती करावी, समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. ढोलताशांच्या गजरात भंडारा उधळून सुमारे अर्धातास अजंठा चौकात महामार्गाचा सेवारस्ता आंदोलकांनी रोखून धरला होता. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्याठिकाणी सातारा शहर पोलिस ठाण्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar Samaj Agitation Against The State Government In Satara