Fruit Village : धुमाळवाडी बनले राज्‍यातील पहिले फळांचे गाव

फळबागांसाठी पोषक वातावरण व अनुकूल नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती असलेल्या धुमाळवाडी येथे १९८५ नंतर डाळिंबाच्या स्वरूपात प्रथमतः फळबागांची लागवड झाली.
Rekha Dhumal
Rekha DhumalSakal

फलटण शहर - फळांचे उत्पादन, फळ प्रक्रिया उद्योग, फळांची निर्यात व पर्यटनाच्या दृष्टीने भरीव कार्य करणाऱ्या व महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात विशेषतः विविध १९ प्रकारच्या फळबाग लागवडीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, डोंगर दऱ्याच्या कुशीत वसलेल्या धुमाळवाडी (ता. फलटण) गावास कृषी विभागाच्या वतीने ‘फळांचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे ‘फळांचे गाव’ म्हणून घोषित झालेले धुमाळवाडी हे महाराष्ट्रातील पहिले व एकमेव गाव ठरले आहे.

फळबागांसाठी पोषक वातावरण व अनुकूल नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती असलेल्या धुमाळवाडी येथे १९८५ नंतर डाळिंबाच्या स्वरूपात प्रथमतः फळबागांची लागवड झाली. १९९०-९१ नंतर गावातील फळबाग लागवड क्षेत्राने गती घेतली. डाळिंब व धुमाळवाडी हे समीकरण राज्यातच नव्हे तर देशाला परिचित झाले. सुमारे बाराशे लोकसंख्या असलेल्या या गावात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे.

गावाजवळून गेलेला कालवा, पाझर तलाव व बोअरवेलच्या माध्यमातून येथील शेतीला पाणी पुरवठा होतो. गावच्या १७१६.८० हेक्टरपैकी १३४५.०४ हेक्टर डोंगराळ भाग आहे. त्यामुळे अवघे ३७१ हेक्टर एवढेच क्षेत्र येथे लागवडीयोग्य आहे. त्यापैकी २५८.७० हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे.

देशभरात डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेल्या धुमाळवाडी येथे २००० नंतर विविध प्रकारच्या फळपिकांच्या लागवडी खालील क्षेत्रांत वाढ झाली. त्यात पेरू, सीताफळ, डाळिंब, आवळा, चिंच, अंजीर, केळी, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, द्राक्षे, चिकू, लिंबू, संत्री, नारळ, आंबा, पपई या फळबागांचा समावेश आहे.

बांधावर सफरचंद, काजू, लिची, मोसंबी, फणस, करवंद, बोर खजूर, ब्लॅकबेरी, तुती, स्टार फ्रूट, वॉटर ॲप्पल अशा विविध फळांची लागवड केली आहे. शेतीसाठी कृषी विभागाच्या प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजनेंतर्गत काहींनी स्वखर्चाने ठिबक केले आहे. फळांचा दर्जा, गुणवत्ता व उत्तम चव यामुळे फळांच्या बाजारपेठेत धुमाळवाडीचा लौकिक उंचावला आहे.

काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने फळांचे उत्पादन घेत आहेत. येथील उत्पादित फळांची बांधावरच थेट विक्री होते. प्रतिवर्षी फळबागेच्या माध्यमातून येथे सुमारे २५ कोटींची उलाढाल होते. उत्पादित फळांवर प्रक्रिया करून जास्तीतजास्त उत्पन्न मिळण्यासाठी गावातील शेतकरी गटाच्या माध्यमातून तसेच वैयक्तिकरीत्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली अन्नप्रक्रिया युनिटही स्थापन करीत आहेत.

या सर्व बाबींची दखल व पाहणी करण्यात येऊन मेगा फूड पार्क, सातारा येथे आयोजित कार्यशाळेमध्ये कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी धुमाळवाडी हे फळांचे गाव म्हणून घोषित केले.

धुमाळवाडीतील शेतकऱ्यांचे फळबाग लागवडीतील काम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दीपस्तंभाप्रमाणे ठरेल. फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत तर काहींनी स्वयंभूपणे फळबागांची लागवड केली. शेतकऱ्यांचे कार्य अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

- सचिन जाधव, कृषी सहायक

गावाला मिळालेला सन्मान भूषणावह आहे. स्वतःच्या विविध बारा प्रकारच्या फळबागा आहेत. घराला ‘फ्रूट पॅलेस’ नाव दिले आहे. गावाला मिळालेल्या या सन्मानात कृषी विभागाचे कृषी सहायक व अधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आहे. फळबागांबाबत मार्गदर्शन हवे, असं ते देण्यासाठी तत्पर आहोत.

- राजाराम पवार, शेतकरी, धुमाळवाडी

कृषी पर्यटनाला चालना...

धुमाळवाडीला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य, येथील नैसर्गिकरीत्या नऊ कुंड व पाच कुंड असलेला प्रसिद्ध धबधबा असलेल्या फळांचे गाव धुमाळवाडीत पर्यटनाबरोबरीने कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

धुमाळवाडीत २५८ हेक्टर फळबाग आहे. आता हे फळांचे गाव झाल्यामुळे तेथील तरुणांना उत्पादन व उत्पादन प्रक्रिया व निर्यात यासाठी प्रेरणा मिळाली. फळबाग लागवड आणखी वाढावी, यासाठी कृषी विभागही प्रयत्नशील आहे. फळांच गाव म्हणून पर्यटन विकास कसा करता येईल, यासाठीही कृषी विभाग काम करेल.

- भाग्यश्री फरांदे- पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com