सातारा जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस पुन्हा बंद

प्रवीण जाधव
Monday, 14 September 2020

किडनीचा आजार असलेला रुग्ण कोरोनाबाधित निघाल्यास त्याला डायलिसिसची गरज भासू शकते. परंतु, जिल्ह्यामध्ये केवळ कृष्णा हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या डायलिसिसची सोय आहे.

सातारा : किडनीचा आजार असलेल्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारी जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस यंत्रणा तीन महिन्यांच्या खंडानंतर जूनमध्ये सुरू झाली. परंतु, ती पुन्हा बंद पडली असल्यामुळे गरीब, गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

किडनीचा आजार असलेल्या एखाद्या रुग्णाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्यानंतर डायलिसिस व किडनी प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा उपचार नाही. किडनी प्रत्यारोपण करणे हे फारच खर्चिक आहे. अशा रुग्णांना आवश्‍यक असलेली किडनी दान करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्याचप्रमाणे योग्य मॅच असलेली किडनी मिळणेही जिकिरीचे असते. एवढ्या अडचणीतून किडनी मिळाली, तरी आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेकांना किडनी प्रत्यारोपण करता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा ही शस्त्रक्रिया पेलणारी नसते. त्यामुळे त्यांच्यासमोरही शस्त्रक्रियेचा मार्ग उपलब्ध नसतो.

खंडाळ्यातील 18 सप्टेंबरपर्यंतचा बंद मागे  

त्यामुळे किडनीच्या रुग्णांच्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी डायलिसिस हा एकमेव पर्याय उपलब्ध असतो. डायलिसिसची सुविधा ही किडनीच्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. त्यामुळे बहुतांश रुग्ण हे डायलिसिस करतात. खासगी रुग्णालयात डायलिसिस करण्यासाठी दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च येतो. त्याबरोबर चार ते पाच डायलिसिसनंतर त्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी दोन ते तीन हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. साधारणतः सुरवातीला आठवड्यातून एकदा, नंतर दोन ते तीन वेळा रुग्णाला डायलिसिस करून घ्यावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांच्यादृष्टीने हा खर्चही पेलणारा नसतो. त्यामुळे किडनीचा आजार झालेल्या रुग्णाच्या कुटुंबासमोरच मोठे संकट निर्माण झालेले असते.

बेड फुल्ल आहेत हेच लोकांना ऐकावे लागत आहे; सातारकरांसाठी आशादायक चित्र निर्माण करा 

जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी व तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या काळात जिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सुविधा सुरू झाली. सुरवातीला दोन मशिन असलेल्या या विभागात सध्या सात मशिनच्या साह्याने रुग्णांचे डायलिसिस होते. त्यामध्ये अत्यंत कमी शुल्कामध्ये रुग्णावर डायलिसिसचे उपचार सुरू झाले होते. परंतु, सहा महिन्यांपूर्वी या विभागातील छत कोसळले होते. तेव्हापासून डायलिसिस विभाग बंद होता. त्यामुळे जिल्ह्यातील या सुविधेची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांचे मोठे हाल होत होते. परंतु, नूतनीकरणानंतर हा विभाग आता जूनमध्ये सुरू झाला. परंतु, काही दिवसांतच हा विभाग पुन्हा बंद पडला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे उपचार खोळंबले आहेत. हा विभाग तातडीने सुरू करण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

खराब हवामानाचा फटका; परराज्यातील नौकांनी शोधले सुरक्षित बंदर, यंत्रणा अलर्ट  

कोविड रुग्णांसाठीही हवी सुविधा 

किडनीचा आजार असलेला रुग्ण कोरोनाबाधित निघाल्यास त्याला डायलिसिसची गरज भासू शकते. परंतु, जिल्ह्यामध्ये केवळ कृष्णा हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या डायलिसिसची सोय आहे. त्यामुळे रुग्णांसाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी डायलिसिसची सोय उपलब्ध करणे आवश्‍यक आहे.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dialysis Machine Facility Of Civil Hospital Need To Upgrade Soon Satara News