Different people : कल्पनाताईंच्या इच्छाशक्तीचा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

Different people : कल्पनाताईंच्या इच्छाशक्तीचा प्रवास

सध्याच्या आधुनिक युगात महिलांनी वाहन चालविणे ही फारशी नावीन्यपूर्ण बाब राहिलेली नाही. मात्र, ग्रामीण भागातील एखादी महिला जेव्हा स्कूल बस चालविते, मुलांची सुरक्षितपणे ने- आण करते. तेव्हा ही गोष्ट नक्कीच कौतुकाचा विषय ठरते. कल्पना शिंदे यांनी हीच किमया यशस्वीपणे साधली आहे. सातारा तालुक्यातील पाटखळ हे त्यांचे गाव. त्या शेतकरी कुटुंबातील. सुरवातीच्या काळात शेतीसह शिवणकामाचा जोड व्यवसाय त्या करत असत.

राजाराम शिंदे हे त्यांचे पती. पाटखळ अन् परिसरातील गावांतील मुलांना ते आपल्या स्कूल बसमधून ने- आण करत असत. नंतरच्या काळात मुलांची संख्या वाढत गेली. मग त्यांनी आणखी एक स्कूल बस घेतली. त्यातून नव्या बससाठी चालकाचा प्रश्न पुढे आला. अशात कल्पनाताईंनी या बसचे चालकत्व स्वीकारण्याची हिंमत दाखविली. त्यासाठी पतीच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालविण्याचे धडे गिरविले. मग वाहन परवाना मिळविला.

त्यातून गेली १२ वर्षे त्या स्कूल बसचालक म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत. मुलांची ने- आण करताना सुरक्षितपणाला त्या नेहमीच प्राधान्य देतात. सर्वांची काळजी घेतात. त्यामुळेच मुलांचे पालकही निर्धास्त असतात. महिला स्कूल बसचालक म्हणूनही त्यांचे वेळोवेळी कौतुक होत असते. पतीसह (कै.) यशवंतराव शिंदे, मुक्ताबाई शिंदे, चतुरा शिंदे, आई कमल साळुंखे (वनगळ), मुले करण अन् नीलिमा या कुटुंबातील सदस्यांचे प्रोत्साहनही या कामी महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्या नमूद करतात.

वेगळ्या वाटेवरचा प्रवास सहजसोपा नसतो. त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता असते. कल्पना शिंदे यांचे उदाहरण याबाबत बोलके ठरावे. त्या स्कूल बस चालक आहेत. ग्रामीण भागातील शाळकरी मुलांना ने- आण करण्याची जबाबदारी त्या यशस्वीपणे पेलतात. त्यामुळेच त्यांचा हा आगळा प्रवास सर्वांसाठीच कौतुकाचा विषय बनला आहे.

विविध पुरस्कारांनी गौरव

कल्पनाताईंनी चोखाळलेल्या या वेगळ्या वाटेचे सर्वत्र कौतुक झाले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सुरक्षित प्रवासाविषयी जागरूकता निर्माण केल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. साताऱ्यातील डॉ. जे. डब्ल्यू. आयरन अॅकॅडमीच्या वतीनेही त्यांना सन्मानित करण्यात आले. खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध परिवहन अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.