जिल्ह्यात पाच धरणांतून सोडले पाणी

मराठवाडी, उरमोडी, कण्हेर, मोरणा, तारळी धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
Discharge of water from Marathwadi Urmodi Kanher Morna Tarli dams in Satara district
Discharge of water from Marathwadi Urmodi Kanher Morna Tarli dams in Satara district

सातारा - गेल्‍या चार दिवसांपासून जिल्‍ह्या‍च्‍या पश्‍चिम भागात पावसाची संततधार सुरू असल्‍याने कण्‍हेर, तारळी, मोरणा-गुरेघर, धोम-बलकवडीबरोबरच जिल्‍ह्या‍च्‍या सीमेवरील वीर धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. या धरणांतून पाण्‍याचा विसर्ग सुरू असून मोरणा, नीरा, कण्‍हेर, तारळी या नद्यांत प्रतिसेकंद २९ हजार ३२९ क्‍युसेक पाणी सोडले आहे. या पाण्‍यामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोयना आणि धोममधील पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी त्‍याठिकाणाहून अद्याप विसर्ग सुरू करण्‍यात आलेला नाही.

जिल्‍ह्या‍‍त पश्‍चिम भागात जुलै महिन्‍यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतीकामांना वेग आला होता. संततधार पावसामुळे कोयनासह इतर सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली होती.

जुलै महिन्‍याच्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यात पावसाने थोडी उसंत घेतली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्‍याचे प्रमाण घटले. ऑगस्‍ट महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात पुन्‍हा एकदा जिल्‍ह्या‍च्‍या विविध भागांत पावसाने झोडपून काढण्‍यास सुरुवात केली.

वेधशाळेने दिलेल्‍या इशाऱ्यानुसार गेले चार दिवस सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड, पाटण, महाबळेश्‍‍वरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे उरमोडी, तारळी, कण्‍हेर, मोरणा-गुरेघर, धोम-बलकवडी या धरणांसह राज्‍यासाठी तारणहार ठरलेल्‍या कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली. संततधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्‍याची आवक जास्‍त असल्‍याने पाणीपातळी नियंत्रित करण्‍यासाठी प्रमुख धरणांतून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्‍यात आला आहे. ‍

सद्य:स्‍थितीत मोरणा-गुरेघर धरणातून ३ हजार २४५ क्‍युसेक, ‘धोम-बलकवडी’मधून ३ हजार १५० क्‍युसेक, ‘कण्‍हेर’मधून २ हजार ८३७, ‘तारळी’तून १ हजार ९८६ क्‍युसेक, ‘उरमोडी’तून सुरू असणारा ५०० क्‍युसेक इतक्‍या विसर्गात सायंकाळी पाच वाजता २ हजार ५०० क्‍युसेकने वाढवण्यात आला.

वीर धरणाच्‍या पायथा वीजगृहातून तसेच डाव्‍या कालव्‍यातून १५ हजार १११ क्‍युसेक पाणी नदीत सोडण्‍यात येत आहे. मराठवाडी धरणातून पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. या सर्व धरणांतून जिल्‍ह्यातून वाहणाऱ्या मोरणा, वेण्‍णा, तारळी, उरमोडी या नद्यांच्‍या तसेच सीमावर्ती भागातील नीरा नदीच्‍या पात्रात प्रतिसेकंद २९ हजार ३२९ क्‍युसेक पाणी सोडले जात आहे.

नदीकाठच्‍या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पावसाच्‍या प्रमाणावर येथून सोडण्‍यात येणाऱ्या पाण्‍यामध्‍ये वाढ करण्‍यात येत असल्‍याने सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे. कोयना तसेच धोम धरणाच्‍या पाणीसाठ्यातही वाढ होत असून त्‍या ठिकाणाहून अद्याप पाण्‍याचा विसर्ग सुरू झालेला नाही.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com