Diwali Festival 2020 चायनाला छेद देत भारतीय आकाशकंदिलांनी उजळणार 'दिवाळी'

दिलीपकुमार चिंचकर
Thursday, 12 November 2020

बाजारपेठ तऱ्हेतऱ्हेच्या आकाशकंदिलांनी भरून गेली आहे. मात्र, लॉकडाउनमुळे घरीच असलेल्या अनेक मुलांनी पारंपरिक कळकाच्या कांब्या, चिरमुरी कागदाचे आकाशकंदील तयार करून अनेकांकडून कौतुक करून घेतले आहे.

सातारा : घर आणि अंगणाबरोबर आकाशही उजळून टाकण्यासाठी आकाशकंदिलाला दिवाळीत तरी पर्याय नसतो. बाजारपेठ तऱ्हेतऱ्हेच्या आकाशकंदिलांनी भरून गेली आहे. मात्र, लॉकडाउनमुळे घरीच असलेल्या अनेक मुलांनी पारंपरिक कळकाच्या कांब्या, चिरमुरी कागदाचे आकाशकंदील तयार करून अनेकांकडून कौतुक करून घेतले आहे. दरम्यान, चकचकी कागदाबरोबरच वेगवेगळ्या आकाराचे, विविध रंगांचे आणि अगदी अनेक वर्षे वापरता येतील अगदी पाण्याने स्वच्छ करता येतील अशा टिकाऊ कापडाचे आकाशकंदीलही बाजारपेठेत दाखल झाले आहे. 

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहर व परिसरातील दुकाने विविध रंगी आकर्षक आकाशकंदिलांनी सजली आहेत. यात चांदणी, अनार, करंजी, आकाशदीप यांचा समावेश आहे. याबरोबरच यंदा आकर्षक कापडी आकाशकंदीलही बाजारात उपलब्ध असून, याच्या किमती 75 रुपयांपासून 260 रुपयांपर्यंत आहेत. यातही नवनवीन डिझायन्स उपलब्ध असून, यात राजस्थानी कलाकुसर दिसून येते. हे कापडी कंदील कोलकता कापडापासून बनविण्यात आले असून, हे कंदील पाण्याने स्वच्छ धुता येतात. या आकाशकंदिलांत प्लॅस्टिक, जेलेटिन, मेटॅलिक, कागद या स्वरूपात उपलब्ध आहेत. जाड कागदाचे कंदील 50 रुपयांपासून पुढे आहेत, तर जिलेटिनचे कंदील 80 रुपयांपासून पुढे आहेत. छोटे आकाशकंदील 80 रुपये डझनापासून पुढे आहेत. कापडी कंदिलापेक्षा जेलेटिनच्या कंदिलांना जास्त मागणी असल्याचे येथील शिरीष पालकर यांनी सांगितले. आकाशकंदिलाबरोबरच सध्या राईस, क्राऊन या विद्युतरोषणाईच्या माळा ही उपलब्ध आहेत. याच्या किमती 60 रुपयांपासून पुढे आहेत. याबरोबरच विद्युत बॉल्सही विक्रीसाठी आले असून, याच्या किमती 70 रुपयांपासून पुढे ओहत. घराच्या सजावटीसाठी आज आकाशकंदिलाबरोबरच विद्युतरोषणाईलाही महत्त्व आलेले दिसून येते. 

दिवाळी खरेदीसाठी साताऱ्यात दुकानं हाउसफुल्ल; ग्राहकांची ब्रॅंडेड कपड्यांना पसंती

जुन्या आठवणींना उजाळा 

सध्या लॉकडाउनमुळे विद्यार्थी घरीच आहेत. दिवाळी जवळ येताच अनेक विद्यार्थ्यांनी पारंपरिक आकाशकंदील तयार करण्यास सुरवात केली आहे. कळकाच्या कांब्या पारंपरिक आकारात बांधून त्याला रंगीत चिरमुरी कागद, जिलेटिन कागद लावून सजविले आहेत, तसेच लोंबत्या झिरमुळ्या लावून आकाशकंदील सजविले आहेत. हे आकाशकंदील जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Festival 2020 News Craze Of Festive Sky Lanterns On The Backdrop Of Diwali iIn Satara City