Diwali Festival 2020 फटाक्यांच्या आतषबाजीत साताऱ्यात लक्ष्मीपूजन; दीपमाळेच्या झगमगाटात सजली रात्र

बाळकृष्ण मधाळे
Saturday, 14 November 2020

शनिवारी सकाळीच साता-यात लक्ष्मीची मूर्ती, झेंडूची फुले आणि पूजाविधीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारनंतर मात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती. सायंकाळ होताच लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली. शहर-उपनगरातील दुकानेही आकर्षकरित्या सजविण्यात आली होती.

सातारा : सातारा शहर परिसरात लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. सध्या देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाचे भान ठेवत किरकोळ प्रमाणातच फटाके उडवत दिवाळी साजरी केली. गुलाबी थंडीत प्रसन्नतेची अनुभूती देणारे सनईचे मंगलदायी सूर, दारांसमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, पानाफुलांच्या तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार अन् आकाशकंदील, पणत्या, दीपमाळेचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात शनिवारी सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन पार पडले. यानिमित्ताने घराघरात, दुकानांमध्ये आणि कार्यालयात श्रीलक्ष्मीची, वह्या आणि खातेपुस्तिकांची मनोभावे पूजा पार पडली अन् त्यानंतर मुक्तहस्ते झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत अवघा आसमंत न्हाऊन निघाला. पोवईनाका, शाहूपुरी, चुना गल्ली, रविवारपेठ इत्यादी भागात लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले.

शनिवारी सकाळीच साता-यात लक्ष्मीची मूर्ती, झेंडूची फुले आणि पूजाविधीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर मात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती. सायंकाळ होताच लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली. शहर-उपनगरातील दुकानेही आकर्षकरित्या सजविण्यात आली. मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे उजळले अन् पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या कुटुंबीयांनी सायंकाळी मुहूर्त साधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लक्ष्मीचे पूजन केले. 

Diwali Festival 2020 लक्ष्मीपुजनाला फटाके उडविताना, अशी घ्या विशेष काळजी

सातारा शहरातील व्यापाऱ्यांनी दुपारनंतर व्यवहार थांबवून दुकाने सजविण्यास प्राधान्य दिले. दुकानांपुढे पाण्याचा सडा टाकून आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. मुहूर्ताची वेळ जसजशी जवळ येत होती, तशी व्यापारी-कर्मचाऱ्यांची पूजेची लगबग वाढत होती. लक्ष्मीपूजनासोबतच प्रथेप्रमाणे चोपड्या-वह्या, खातेपुस्तिका आणि दुकानाची साग्रसंगीत पूजा पार पडली. यानिमित्ताने पोवईनाका रस्त्यासह सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Festival 2020 News Lakshmi Pujan Was Celebrated In Satara City Area