श्री क्षेत्र राजपुरीतील कार्तिक योग यात्रा रद्द

 रविकांत बेलाेशे
Saturday, 28 November 2020

दर तीन वर्षांतून खास महिलांसाठी हा योग येत असतो. तो यंदा रविवारी (ता.29) येत आहे. तीन वर्षांनी या योगा निमित्त कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. यावेळी सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. 

भिलार ( सातारा) : श्री क्षेत्र राजपुरी (ता.महाबळेश्वर) येथे कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा तीन वर्षातून खास माहिलांसाठी येणारा योग रविवारी (ता.29) येत आहे. परंतु ग्रामस्थांनी यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परगावाहून कुणीही दर्शनासाठी येवू नये, असे आवाहनही ग्रामस्थांनी केले आहे. 

आज शनिवारी पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सतीश पवार यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी चर्चेअंती कोरोना संकटामुळे मंदिर व परिसरात भाविकांची गर्दी होवू नये, यासाठी यंदा कार्तिक स्वामी मंदिरात फक्त धार्मिक विधी करून बाकी अन्नदान व इतर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. दर तीन वर्षांतून खास महिलांसाठी हा योग येत असतो. तो यंदा रविवारी (ता.29) येत आहे. तीन वर्षांनी या योगा निमित्त कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. यावेळी सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. 

राजपूरी येथे कार्तिक स्वामी मंदिरात वेगवेगळ्या आकारांच्या गुहा असून मल्लिकार्जुन, दत्तकुंड, विष्णूकुंड नावाची पाण्याची तीन कुंड आहेत. दुसऱ्या गुहेत शिवलिंग आहे. तिसऱ्या गुहेला विष्णू गुहा म्हणून प्रसिद्ध आहे. यात गगनगिरी महाराजांचे वास्तव्य होते. चौथी गुहा आकाराने लहान आहे. त्यात शिवलिंग स्थापित असून समोर नंदी आहे. पाचही गुफा कार्तिक स्वामी नावाने ओळखल्या जातात. यात या सर्व गुहांमध्ये महिलांना दर्शनासाठी मनाई आहे.

दर तीन वर्षांनी महिलांना दर्शनाचा योग प्राप्त होतो. राजपुरी या गावाला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे यावर्षी वेगळे महत्त्व आले असते, परंतु ग्रामस्थांच्या निर्णयाने कार्तिक स्वामी भक्तांना मुख्य करून महिलांना आता पुन्हा दर्शनासाठी तीन वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to corona Kartik Yoga Yatra in Shri Kshetra Rajpuri has been canceled