मुकाबला कोरोनाशी : साता-याला हवेत सत्याऐंशी कोटी अन्‌ पाच हजार इंजेक्‍शन

उमेश बांबरे
Monday, 21 September 2020

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील जम्बो हॉस्पिटल येत्या 25, 26 सप्टेंबरला सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ऑक्‍सिजन बेड तरी रुग्णांना वेळेत उपलब्ध होऊ शकणार आहेत.
 

सातारा : कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची साथ मिळाली आहे. पण, कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तब्बल 87 कोटींची मागणी केली आहे. त्यासोबतच पाच हजार रेमडिसिव्हरच्या इंजेक्‍शनची मागणी केली असून, खासगी रुग्णालयांनाही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे यातून कोरोना रुग्णांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यंत्रणा कार्यरत झाली आहे. कोरोना हॉस्पिटल, कोरोना केअर सेंटर यासोबतच खासगी रुग्णालयांतही उपचार केले जात आहेत. आता वाढलेली रुग्णसंख्या पाहता आहे ही यंत्रणा कमी पडू लागली आहे. तरीही जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणा उभी करण्यासाठी शर्तीने प्रयत्न सुरू आहेत. आता खासगी रुग्णालयांनाही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुभा दिली असून, तेथे वाढीव बेड उपलब्ध होणार आहेत. त्यासोबतच वाढत्या रुग्णसंख्येला उपचार व इतर सुविधा मिळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी तब्बल 87 कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. यामध्ये कोरोना हॉस्पिटल व कोरोना केअर सेंटरमध्ये वाढीव यंत्रणा उभारणे, रेमडिसिव्हरच्या इंजेक्‍शनची उपलब्धता करणे, डॉक्‍टर्स व नर्सेस यांना राहण्याची व्यवस्था करणे, कोरोना केअर सेंटरमधील जेवण, चहा, नाष्ट्याची सोय करणे, विविध कारणास्तव वापरण्यात येणाऱ्या ऍम्बुलन्सना भाडे देणे, नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटलमध्ये यंत्रणा उपलब्ध करणे आदींचा समावेश आहे.

खंबाटकीच्या 'एस' वळणावर सुरक्षिततेच्या अनाेख्या उपाययाेजना
 
तसेच रेमडिसिव्हर इंजेक्‍शनची उपलब्धता तातडीने होण्यासाठीही जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तब्बल पाच हजार इंजेक्‍शनची मागणी केली आहे. ही इंजेक्‍शन शासकीय दरात सुमारे 3,392 रुपयांत उपलब्ध केली जात आहेत. त्याचा तुटवडा जाणवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनानेही उपाययोजना केली आहे. खासगी रुग्णालयांना ही इंजेक्‍शन्स आवश्‍यक असल्यास त्यांना त्याबाबतचे पत्र जिल्हा रुग्णालयात दिल्यानंतर शासकीय फी डीडीने भरून मगच ही इंजेक्‍शन्स दिली जातात. आतापर्यंत जिल्ह्यात गंभीर झालेल्या रुग्णांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रेमडिसिव्हरची इंजेक्‍शन दिली होती. तसेच शासनाकडून दीड ते दोन हजार इंजेक्‍शन्स उपलब्ध झाली आहेत. त्यांचा वापर आतापर्यंत झालेला आहे. आता वाढत्या रुग्णसंख्येत गंभीर रुग्णांना तातडीने ही इंजेक्‍शन्स मिळावीत म्हणून आणखी पाच हजार इंजेक्‍शनची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

वात्सल्यला बिल्डर्सचं बळ; सदस्यांना मिळणार मोफत श्वास 

जम्बो हॉस्पिटल लवकरच रुग्णांच्या सेवेत... 

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील जम्बो हॉस्पिटल येत्या 25, 26 सप्टेंबरला सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ऑक्‍सिजन बेड तरी रुग्णांना वेळेत उपलब्ध होऊ शकणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eighty Seven Crore Fund Needs For Covid 19 Jumbo Hospital Satara News