'जावली'त निवडणुकीचे वारे; पदांसाठी मातब्बरांनी थोपटले दंड

महेश बारटक्के
Monday, 12 October 2020

गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश संचालकांचे मोबाईल हे नॉट रिचेबल लागत आहेत. अनेक संचालकांचा संपर्क होत नसून काही जण अज्ञातस्थळीही गेले असल्याची चर्चा आहे. बॅंकेच्या कामकाजात सातत्याने राजकीय हस्तक्षेप वाढत चालल्याने संचालकांना दबावाखाली काम करावे लागत असल्याची खंतही काहींनी व्यक्त केली आहे.

कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुक्‍याची मुख्य अर्थवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या व तब्ब्ल 1,300 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या जावली सहकारी बॅंकेच्या विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांनी नुकतेच राजीनामे दिल्याने बॅंकेत खांदेपालट होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. या दोन्ही पदांसाठी अनेक मातब्बरांनी दंड थोपटले आहेत. मंगळवारी (ता. 13) या निवडी होणार आहेत.
 
बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक होऊन पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र, कोरोनामुळे सर्वच निवडणुका रद्द झाल्याने विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत गावडे व उपाध्यक्ष प्रकाश मस्कर यांना पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. अजून काही महिन्यांचा कालावधी असतानाही अचानकपणे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली. या दोघांचे अचानकपणे राजीनामे घेण्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या राजीनामानाट्याने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा खांदेपालट केवळ मर्जीतील संचालकांना खूष करण्यासाठीचाच अट्टाहास असल्याची चर्चाही काही सभासदांत दबक्‍या आवाजात सुरू आहे. आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले व मकरंद पाटील या तीन आमदारांसह वसंतराव मानकुमरे यांची पकड असल्याने बॅंकेला राजकीय क्षेत्रात विशेष स्थान आहे. जावली बॅंकेत गेल्या काही दिवसांपासून पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागल्याने अनेकांनी दंड थोपटले आहेत. मात्र, बॅंकेच्या हितासाठी अनुभवी नेतृत्वाकडेच बॅंकेची सूत्रे सोपवावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्रातील समृद्धी शेडगेची इस्त्रोत चमक
 
यापुढील काळातही बॅंकेला डिजिटल बॅंकिंगमध्ये व कार्पोरेट स्पर्धेत प्रगतिपथावर नेण्यासाठी बॅंकेची सत्ता ही अनुभवी व बॅंकिग क्षेत्राचा अभ्यास असणाऱ्या नेतृत्वाकडेच सोपवली जावीत, असाही सूर आहे. पदाधिकारी निवडीसाठी मंगळवारी संचालकांची बैठक होणार असून त्यात नूतन पदाधिकाऱ्यांची अधिकृत निवड होण्याची शक्‍यता आहे. अध्यक्षपदासाठी जावळीतील करहर व मेढा विभागातील संचालकांची नावे आघाडीवर असून उपाध्यक्षपदासाठी वाई तालुक्‍याला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत जावळी तालुक्‍यासह जिल्ह्यातील सभासदांमध्ये उत्सुकता आहे.

जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू: सामना

बहुतांश संचालक "नॉट रिचेबल' 

जावली बॅंकेत गेल्या काही दिवसांपासून पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागल्याने अनेकांनी दंड थोपटले आहेत. मात्र, खांदेपालट हा केवळ मर्जीतील संचालकांना खूष करण्यासाठीचाच अट्टाहास असल्याने अनेक संचालकांत नाराजीचा सूर आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश संचालकांचे मोबाईल हे नॉट रिचेबल लागत आहेत. अनेक संचालकांचा संपर्क होत नसून काही जण अज्ञातस्थळीही गेले असल्याची चर्चा आहे. बॅंकेच्या कामकाजात सातत्याने राजकीय हस्तक्षेप वाढत चालल्याने संचालकांना दबावाखाली काम करावे लागत असल्याची खंतही काहींनी व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election For President And Vice President DMK Jaoli Bank Satara News