
Satara : मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांत नैराश्य
विंग- मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकटेपणाची भावना वाढीस लागते. त्यातून तणाव निर्माण होऊन नैराश्य येते. अभ्यासावर परिणाम होऊन भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर काळजीपूर्वक आणि योग कारणासाठी करावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते यांनी केले.
कुसूर (ता. कऱ्हाड) येथील सद्गुरू गाडगे महाराज विद्यालयात आयोजित शालेय कायदे व विद्यार्थी सुरक्षितता या विषयावर विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. पोलिस पाटील प्रकाश शिणगारे अध्यक्षस्थानी होते. आरएसपी अधिकारी झहीर शेख, मुख्याध्यापिका एस. सी. बोडरे, एन. ए. देसाई यासह आरोग्य कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
दुधभाते म्हणाल्या, ‘‘विद्यार्थी मोबाईल फोनद्वारे नको असलेल्या गोष्टीत अडकतात. त्यांच्या मनावर व वागणुकीवर विपरीत परिणाम होतो. स्मार्टफोन हा वेळेचा अपव्यय आहे. फोनचा वापर सातत्याने करून विद्यार्थी आपला मूल्यवान वेळ वाया घालवतात. पब्जी, सेल्फी, टीकटॅाक, पॅार्न्स, यासह चित्रपट पाहणे आदी बाबीत स्वतःचा वेळ वाया घालवून ताण- तणाव घेतात. आरोग्यावर परिणाम करून घेतात. मोबाईलचा वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले.’’
शिणगारे म्हणाले, ‘‘मोबाईलचा अतिवापर आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. विद्यार्थी योग्यविश्रांती घेत नाहीत. रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर असतात. त्यामुळे झोप कमी होणे, दृष्टी कमी पडणे आदीआजाराला बळी पडतात. त्यासाठी मोबाईल टाळा आणि चांगल्या गोष्टीत लक्ष घाला.’’ एस. सी. बोडरे यांनी प्रास्ताविक केले. पी. आर. माने यांनी आभार मानले.