आता नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारे शेतकरी देणार कृषीविषयक सल्ला

हेमंत पवार
Monday, 26 October 2020

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवा तेव्हा कृषी सल्ला मिळावा, यासाठी जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त 54 व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या 78 अशा 132 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण झाल्यावर ते अन्य शेतकऱ्यांना कृषी सल्ला देणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही कृषी विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

कऱ्हाड ः शेतकऱ्यांवर सातत्याने निसर्गाची अवकृपा होत असल्याने ते कायमच संकटात सापडतात. त्यातून सावरून नव्याने आपल्या शेतात कोणती पिके घेता येतील, ते घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याला कोणती खते, कीटकनाशके द्यावीत, त्याचे मार्केट कसे असेल अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना त्याच्या गावाजवळच मिळावीत, यासाठी कृषी विभागाने आता पुरस्कार प्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शेतकऱ्यांच्यीा रिसोर्स बॅंकेची स्थापना केली आहे. त्याद्वारे आता तातडीने सल्ला मिळणे शक्‍य होऊन शेतकऱ्यांनाही शेतीतील प्रगत तंत्रज्ञानाची माहिती त्यांच्या गावाच्या जवळपासच मिळणार आहे.
 
शेतकरी मोठ्या उमेदीने चार पैसे मिळतील या आशेने पिके घेतात. मात्र, त्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडतात. त्यातून सावरून त्यांना नव्या उमेदीने पिके घेण्यासाठी कृषी सल्याची गरज असते. अशा वेळी कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही शेतकऱ्यांपर्यंत आवश्‍यक माहिती पोचण्यासाठी मर्यादा येतात. त्याचा विचार करून कृषिमंत्री दादा भुसे आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने आता शेतकऱ्यांना समजेल त्या पद्धतीने सल्ला देण्यासाठी यंत्रणेची उभारणी करण्याचा निर्धार केला आहे.

वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंत्र्यांनी राज्यातील पुरस्कार प्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील 34 जिल्ह्यांतील तब्बल पाच हजार नऊ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना एकत्रित केले जाणार आहे. त्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. पुरस्कार प्राप्त शेतकरी हे आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करून त्यातून तावून-सुलाखून तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाचा आणि अनुभवाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. निवडलेल्या पुरस्कारप्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शेतकऱ्यांना आता कृषी विद्यापीठे व तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून शेतकऱ्यांना हवा तेव्हा कृषी सल्ला मिळण्याची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्या हंगामात कोणती पिके घेता येतील, ते घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याला कोणती खते, कीटकनाशके द्यावी, त्याचे मार्केट कसे असेल अशा प्रश्नांची उत्तरे त्यांच्या गावाजवळच मिळण्याची सोय होणार आहे. 

ही तर हर्ड इम्यूनिटीची चिन्ह ! कमी होणाऱ्या रुग्णनोंदीवर सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांचे मत
 

जिल्ह्यातील 134 शेतकऱ्यांचा सहभाग 

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवा तेव्हा कृषी सल्ला मिळावा, यासाठी जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त 54 व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या 78 अशा 132 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण झाल्यावर ते अन्य शेतकऱ्यांना कृषी सल्ला देणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही कृषी विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांच्या सल्यासाठी पुरस्काप्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शेतकऱ्यांच्या रिसोर्स बॅंकेची स्थापना केली आहे. त्यामध्ये राज्यातील 34 जिल्ह्यांतील 5009 शेतकऱ्यांचा सहभाग आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्याच परिसरात हमखास शेतीसल्ला मिळेल.

डॉ. एन. टी. शिसोदे, कृषी संचालक, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expert Farmers Will Guide Agriculture Department And Farmers Satara News