खासगी रुग्णालयांत रुग्ण पळवण्याचे प्रकार; पाटणमध्ये दलालांना कमिशन

खासगी रुग्णालयांत रुग्ण पळवण्याचे प्रकार; पाटणमध्ये दलालांना कमिशन

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍याचा बहुतांशी भाग डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांनी विखुरलेला आहे. समस्यांनी ग्रासलेल्या या गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या या जीवनाशी निगडित आहेत. भरमसाट औषधांचा मारा, तपासणी फीच्या ओझ्याखाली रुग्ण दबला जात आहे. सरकारी दवाखान्यांत लक्ष देत नाहीत. चांगले उपचार करत नाहीत, अशी मानसिकता बदलून दलालांमार्फत आपल्या खासगी रुग्णालयांत रुग्णांना पळवण्याचे प्रकार वाढले आहेत. दलालांना कमिशन दिले जात असल्याचे समोर आले आहे. नातेवाईक मात्र डॉक्‍टर आपल्या रुग्णांना काही करतील, या भीतीने तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. 

पाटण हे तालुक्‍याचे ठिकाण असून या ठिकाणी एकही सुसज्ज असा दवाखाना नसल्याने येथील जनतेला कऱ्हाड किंवा सातारा येथील रुग्णालयांच्या भरवशावर अवलंबून राहावे लागत आहे. कोरोना काळात बहुतांशी डॉक्‍टरांनी आपली प्रॅक्‍टीस बंद केलेली आहे. सध्या तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. खासगी दवाखाने व रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जाते. अनावश्‍यक तपासण्या, महागडी औषधे, भरमसाट बिले अशा अनेक प्रकारे या रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट केली जाते. 

मात्र, रुग्णांना असलेल्या हक्कांविषयी जागृती नसल्याने ते हे प्रकार निमूटपणे सहन करतात. जखमी रुग्णांवर प्रथमोपचार करणे रुग्णालयाला बंधनकारक आहे. याशिवाय उपचाराचा अंदाजे कालावधी, येणारा खर्च, "सेकंड ओपनियन'चा हक्क रुग्णांना आहे. मात्र, याविषयी रुग्णांना माहिती नसल्याचा गैरफायदा बड्या खासगी रुग्णालयांकडून घेतला जात आहे. महागड्या उपचारांच्या नावाखाली बड्या खासगी रुग्णालयांकडून गरजू रुग्णांची केली जाणारी संघटित लूट रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.

पाटण तालुक्‍यातील खासगी आणि सरकारी दवाखान्यांतील डॉक्‍टरांनी प्रथमोपचार करणे गरजेचे आहे. आवश्‍यक असेल तरच रुग्ण रेफर करण्यासाठी पुढील दवाखान्यात पाठवावा. सर्रास चाललेला चिठ्ठीचा खेळ थांबवून नागरिकांच्या आरोग्याच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे. 

-बशीर खोंदू, माजी सदस्य, सातारा जिल्हा परिषद  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com