हा कारखाना करणार पाच लाख टन उसाचे गाळप

व्यंकटेश देशपांडे
Friday, 14 August 2020

फलटणमधील श्रीराम साखर कारखाना आर्थिक गर्तेत रुतल्यानंतर अवसायानात काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तथापि, श्रीमंत मालोजीराजे यांनी स्थापन केलेला हा कारखाना सुरू ठेवला असून, यंदा पाच लाख टन उसाचे गाळप करण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ही माहिती दिली.

फलटण (जि. सातारा) ः शहरातील श्रीराम साखर कारखाना आर्थिक गर्तेत रुतल्यानंतर अवसायानात काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तथापि, श्रीमंत मालोजीराजे यांनी स्थापन केलेला हा कारखाना सुरू ठेवला असून, यंदा पाच लाख टन उसाचे गाळप करण्यात येणार असल्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

येथील श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाच्या सन 2020- 2021 मधील 15 व्या गळीत हंगामातील रोलर पूजन श्री. निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कारखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी रामराजे निंबाळकर बोलत होते. 

रामराजे म्हणाले, ""जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांच्या सहकार्याने श्रीराम जवाहर साखर उद्योगाच्या माध्यमातून श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब व शिवाजीराजे यांनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्या हिताला प्राधान्य देत श्रीरामाला पूर्व वैभवाप्रत नेण्याचे प्रयत्नात यशस्वी होत आहे. ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांच्या हिताला प्राधान्य, विशेषतः उसाला रास्त दर, वेळेवर तोड, योग्य वजन, नियमानुसार वेळेवर उसाचे पेमेंट, त्याचप्रमाणे कामगारांना पगार व त्यांची सर्व देणी वेळेवर मिळतील. यासाठी प्राधान्य देणार आहे. श्रीरामला पूर्ववैभवाप्रत नेताना अडचणींचा सामना करावा लागला; परंतु खासदार शरदराव पवार यांचे मार्गदर्शन आणि माजी खासदार कल्लाप्पाआण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह सर्वांच्या सहकार्याने ते शक्‍य झाले.'' 

प्रारंभी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. गेल्या वर्षीच्या हंगामात तीन लाख 39 हजार 632 मेट्रिक टन उसाचे गाळप करून तीन लाख 80 हजार 385 क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याचे, तसेच प्रतिटन 2563 रुपयेप्रमाणे गाळपास आलेल्या संपूर्ण उसाचे पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वेळेत जमा केले. तोडणी वाहतूक ठेकेदार, कामगार यांचीही सर्व देणी, पगार वेळेत दिल्याचे त्यांनी सांगितले. 

या वर्षीच्या हंगामात प्रतिदिन 3200/3300 मेट्रिक टन गाळप करून पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगून डॉ. शेंडे म्हणाले, ""आतापर्यंत कार्य क्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचे 5968 हेक्‍टर व बिगर सभासद शेतकऱ्यांचे 2522 हेक्‍टर क्षेत्रातील ऊसनोंदणी झाली आहे.'' कार्यक्रमास श्रीरामचे संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मानसिंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

या गावात स्वातंत्र्यदिनाचा साक्षीदार अडगळीत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The factory will grind five lakh tonnes of sugarcane