महार्गालगतची जमीन क्षारपड होण्याचा धोका; रस्त्याची उंची वाढल्याचा परिणाम

अमोल जाधव
Wednesday, 30 September 2020

केंद्रीय रस्ते विकास मंडळाकडून तीन वर्षांपासून कऱ्हाड-तासगाव राज्यमार्गाचा दर्जा वाढवून राष्ट्रीय महामार्ग करण्यात आला. त्याअंतर्गत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सातारा व सांगली जिल्ह्यासह दोन राज्यातील वाहतुकीस हा रस्ता वरदायी ठरणार आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे.

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कऱ्हाड-तासगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दळणवळणास उपयुक्त ठरणार आहे. परंतु, या मार्गाकडेच्या जमिनी क्षारपड होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जमिनीपेक्षा रस्त्याची उंची वाढल्याने जमिनीत पाणी साचून राहत आहे. भविष्यात शेकडो एकर जमीन क्षारपड होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

केंद्रीय रस्ते विकास मंडळाकडून तीन वर्षांपासून कऱ्हाड-तासगाव राज्यमार्गाचा दर्जा वाढवून राष्ट्रीय महामार्ग करण्यात आला. त्याअंतर्गत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सातारा व सांगली जिल्ह्यासह दोन राज्यातील वाहतुकीस हा रस्ता वरदायी ठरणार आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील कऱ्हाड व सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस तसेच तासगाव तालुक्‍यातील शेकडो एकर शेतीमध्ये रस्त्याची उंची वाढल्याने पाणी साठण्याची भीती आहे. 

कऱ्हाडात राज्यमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू; नागरिकांतून समाधान

या रस्त्याची उंची पूर्व-पश्‍चिमेकडील जमिनीपेक्षा पाच फुटांपेक्षा जास्त असल्याने पूर्वेकडील भागात पाणी साठून राहते. त्यामुळे जमीन क्षारपड होण्याची शक्‍यता आहे. रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी काढण्यासाठी गटारे आहेत. त्यातील पाणी ओढ्यांना वाहून जाणार आहे. मात्र, पूर्वेकडील भागातील ऊस शेतीत ते साठून राहण्याचे प्रमाण वाढणार आहे. पूर्वेकडील जमीन क्षारपड होण्याचा धोका आहे. याबाबत खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी वडगाव हवेलीचे शेतकरी काकासाहेब जगताप यांनी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Are Worried As Water Is Being Conserved In The Soil Satara News