एफआरपीच्या तुकड्याला शेतकरी संघटनांचा विरोध; आंदोलनाची पडणार ठिणगी I Sugar Factory | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Cane

जिल्ह्यात सहकारी व खासगी असे १६ साखर कारखाने यावर्षीही गाळपाच्या तयारीत आहेत.

एफआरपीच्या तुकड्याला शेतकरी संघटनांचा विरोध

सातारा : रास्‍त आणि किफायतशीर भावाचे (FRP) तुकडे करून शेतकऱ्यांना बिले देण्याची भूमिका कारखान्यांची असून त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका स्पष्ट झालेली नाही. या परिस्थितीत जिल्ह्यातील आठ सहकारी व आठ खासगी साखर कारखाने (Private Sugar Factory) ऑक्टोबरपासून गळीत सुरू करत आहेत. शेतकरी संघटनांनी (Shetkari Sanghatana) एफआरपीच्या तुकड्याला विरोध केल्याने या प्रश्‍नावरून आंदोलनाची चिन्हे आहेत. दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने उसाच्या वजनावर परिणाम झाला आहे. सांगली, कोल्हापूरला पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सहकारी व खासगी असे १६ साखर कारखाने यावर्षीही गाळपाच्या तयारीत आहेत. गेल्या वर्षी ऐन कोरोनात कारखान्यांनी संपूर्ण उसाचे गाळप करत सर्वाधिक कोटी क्‍विंटलच्या घरात साखरनिर्मिती केली. त्यामुळे कारखान्यांचा मागील हंगाम चांगला फायद्यात गेला आहे. यावर्षी सर्वच कारखान्यांचे बॉयलर पेटले असून आता ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष गाळप हंगाम सुरू होणार आहे. यावर्षी प्रथमच इतक्या लवकर हंगाम सुरू होऊन तो लवकर संपणारही असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी जिल्ह्यात ऊस उपलब्ध असला तरी पावसाळ्यात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत आलेल्या पुरामुळे उसाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तेथील कारखाने आता सातारा जिल्ह्यातील ऊस घेऊन जाऊन त्याचे गाळप करण्याची युक्ती लढवू शकतात. त्यातूनच उसाची पळवापळवी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

हेही वाचा: कोण कोणाच्या दावणीला बांधलेलं नाही, आता दावणचं मजबूत करू

जिल्ह्यात सध्या गेल्या वर्षीच्या गाळप केलेल्या उसाच्या बिलाची बाकी देण्यावरून शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एफआरपीचे तुकडे करून कारखाने बिले देत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. त्यातून शेतकऱ्यांना कोणतीही देणी भागविता येत नसल्याने एकरकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. तर, दुसरीकडे साखर कारखाने मात्र, शासनाच्या भूमिकेकडे लक्ष देऊन आहेत. कारखान्यांनी अद्याप एफआरपीबाबत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. पण, शेतकरी संघटनांनी आवाज उठविण्यास सुरवात केल्याने ऐन हंगामाच्या तोंडावर वाद चिघळण्याची भीती आहे. गेल्या वर्षी बहुतांश कारखान्यांनी आपापली एफआरपी रक्कम पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच पायंडा यावर्षीही राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: जरंडेश्वर कारखाना घोटाळ्यात अजित पवारांचा हात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता शेतकऱ्यांत एफआरपीविषयी जागृती करण्याची भूमिका घेत गावोगावी मेळावे घेण्यास सुरवात केली आहे. एफआरपीचे तुकडे झाल्यास शेतकरी उद्‌ध्‍वस्त होईल. त्यामुळे या प्रश्‍नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे.

- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

हेही वाचा: शरद पवारांचं नाव घेऊन उभी हयात सत्तेचं केंद्रीकरण केलं

एफआरपीचे तुकडे होऊ नयेत, शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी रयत क्रांती संघटनेने यावेळेस आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कारखान्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे संघटनेचे म्हणणे आहे.

- प्रकाश साबळे, युवक जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना

Web Title: Farmers From Satara Sangli And Kolhapur Will Agitation From Frp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :shetkari sanghatana
go to top