वाईतील शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत; शासनाची घोषणा हवेत

भद्रेश भाटे
Wednesday, 18 November 2020

वाई तालुक्यामध्ये गेल्या महिन्याभरापूर्वी मुसळधार पडलेल्या पावसाने वाई तालुक्याच्या पश्चिम भागात नाचणी, भात व कडधान्ये परिपक्व होऊन कापणीच्या उंबरठ्यावर असतानाच या नगदी पिकांवर झालेल्या मुसळधार पावसाने घाला घालून प्रसंगी व्याजाने किंवा सोसायटीचे पिक कर्ज घेऊन आणि दागिने घाण ठेवून, तर काहींनी खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे उचलून वेगवेगळ्या जातींची बी-बियाणे खते खरेदी करून पेरणी केली होती.

वाई (जि. सातारा) : गेल्या चार दिवसांपासून हवामानामध्ये बदल झाल्यामुळे वाईच्या पश्चिम भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने, तसेच गेल्या महिन्याभरापूर्वी मुसळधार पावसाच्या तावडीतून शिल्लक राहिलेल्या भातशेतीतून आजही गुडघाभर पाण्यात उभ्या असलेल्या भाताच्या पिकाची कापणी करून वाळवून, झोडनी वारंगुळा पद्धतीने जोमात सुरु आहे. नुकसानीचे पंचनामे होऊन देखील शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याचे दिसत आहेत.

वाई तालुक्यामध्ये गेल्या महिन्याभरापूर्वी मुसळधार पडलेल्या पावसाने वाई तालुक्याच्या पश्चिम भागात नाचणी, भात व कडधान्ये परिपक्व होऊन कापणीच्या उंबरठ्यावर असतानाच या नगदी पिकांवर झालेल्या मुसळधार पावसाने घाला घालून प्रसंगी व्याजाने किंवा सोसायटीचे पिक कर्ज घेऊन आणि दागिने घाण ठेवून तर काहींनी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे उचलून वेगवेगळ्या जातींची बी-बियाणे खते खरेदी करून पेरणी केली होती. त्यावेळी पाण्याच्या आवश्यकतेनुसार निसर्गानेही येथील शेतक-यांना साथ देऊन वेळोवेळी पाऊस पडल्याने वाईच्या पश्चिम भागातील भातशिवारातील पिके अतिशय देखणी व मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देतील, अशा शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच अवेळी निसर्ग अचानकपणे बिघडून कापणीच्या  व काढणीच्या उंबरठ्यावर असलेली ही पिके अचानकपणे मुसळधार पाऊस सुरु झाल्याने व या परिसराला चारी बाजूने डोंगर असल्याने डोंगररांगावरील पावसाच्या पाण्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने पाण्याला वाट मिळेल तेथून शेती उध्वस्त करीत भात पिकांच्या शिवारात घुसले आणि भाताची खाचरे तुडुंब भरल्याने या सर्व पिकांचा जारवा कुजून गेल्याने उभी भात पिके जमीनदोस्त झाली, त्यामुळे भाते जळून शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

माण तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

नाचणीची कणसे व पिके गुडघाभर पाण्यात कोसळल्याने कणसे कोंबवली त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. याची जाणीव गंभीरतापूर्वक घेवून राज्य सरकारने, तसेच सातारा जिल्हाधिकारी यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत करण्यास्तव तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. दोन दिवसात सर्कल, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक यांनी तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल जिल्हाधिका-यांमार्फत शासनाला दिला. नुकसानग्रस्त शेतक-यांना झालेल्या पंचनाम्यातून शासन हेक्टरी १० हजार रुपये मदत करण्याची घोषणा त्यावेळी शासनाने केली होती. या पैशातून दिवाळी गोड होईल या आशेवर सर्व शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीची वाट पाहत होते. पण, दुर्दैवाने दोन महिने होत आले तरी शासनाच्या घोषणेप्रमाणे आजतागायत आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी बी-बियाणे व खते यांच्या उधारी उसनवारीवरील कर्ज हे कसे भरायचे या विवंचनेत आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers In Wai Are Waiting For Financial Help From The Government Satara News