Wai News : धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू

धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आंबेदरा-आसरे (ता. वाई) येथे आज घडली.
Uttam Dhawale and Abhijit Dhawale
Uttam Dhawale and Abhijit Dhawalesakal

वाई - धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आंबेदरा-आसरे (ता. वाई) येथे आज दुपारी दोनच्या सुमारास घडली.

उत्तम सहदेव ढवळे (वय ४५) व अभिजीत उत्तम ढवळे (वय १३) अशी मृताची नावे आहेत. या घटनेमुळे तालुक्याच्या पश्चिम भागावर शोककळा पसरली. याबाबत घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, धोम धरणाच्या जलाशयातून आसरे गावाजवळच्या बोगद्यातून बलकवडी धरणाचे पाणी कालव्याद्वारे भोर, खंडाळा व फलटण तालुक्याला पाणी नेण्यात आले आहे.

सध्या कालवा बंद असल्याने याठिकाणी गेट टाकलेले आहे. या बोगद्या अलीकडे असलेल्या कालव्याच्या पाण्यात उत्तम ढवळे व अभिजीत ढवळे हे पितापुत्र दुपारी पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कालव्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. आजूबाजूच्या लोकांनी आरडा ओरडा केला. त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.

यानंतर पोलिस पाटील यांनी महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनीलबाबा भाटिया यांनी सदरची माहिती दिली. त्यांनी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व वाई आपदा ट्रेकर्स यांच्या सदस्यांना कळविले. त्यांनी पाण्यात शोध मोहीम राबवली. ही शोध मोहीम तीन तास राबविण्यात आली. सायंकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

यावेळी शोध मोहीमेतील सदस्य आशुतोष शिंदे (वाई) यांच्या डोक्याला बोगद्यातील लोखंडी बार लागल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या शोध मोहिमेत सुनील भाटिया, अमित कोळी, सचिन डोईफोडे, सौरव साळेकर, सौरभ गोळे, महेश बिरामणे, अजित जाधव, आशिष बिरामणे, ऋषिकेश जाधव यांनी सहभाग घेतला.

सायंकाळी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वाई येथे आणण्यात आले होते. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. उत्तम ढवळे हे शेतकरी असून त्यांचा चिकनचा व्यवसाय होता. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. उत्तम ढवळे हे पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे या दुर्देवी घटनेबद्दल तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com