साताऱ्यात 50 कोटींचे जंबो हॉस्पिटल!, मुख्यमंत्र्यासह लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्वाची

उमेश बांबरे
Friday, 28 August 2020

प्रत्येक जिल्ह्यातून कोरोना हॉस्पिटलसाठी प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यासाठी अत्यावश्‍यक असलेल्या 50 कोटींच्या जंबो हॉस्पिटलच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे काय भूमिका घेणार, याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

सातारा : कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण प्रतिदिन 500 च्या वर गेल्यानंतर आता बेड कमी पडू लागल्याने रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता जंबो हॉस्पिटलचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला आहे. सुमारे 50 कोटींच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जंबो हॉस्पिटलच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास साताऱ्यात सुमारे 500 बेडचे हॉस्पिटल उभे राहणार आहे.

कोरोना संसर्गाचा जिल्ह्यात कहर सुरू झाला असून, दररोज 500 वर रुग्ण बाधित सापडत आहेत. तर दुसरीकडे सध्या कोरोना संसर्गित 5,010 रुग्णांवर विविध हॉस्पिटलसह कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा 11 हजार 643 वर गेला आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढले असून, दररोज पाच ते नऊ रुग्णांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत 333 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाच्या चाचण्या वाढल्याने रुग्ण वाढत असले तरी प्रत्यक्षात गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात एक ते 25 ऑगस्ट अखेर तब्बल 47 हजार 704 लोक जिल्ह्यात आलेले आहेत. त्यातूनही कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे.

पोलिसांची कृष्णकृत्ये लपविण्यासाठी वर्षा देशपांडेंवर खोटा गुन्हा : ऍड. शैला जाधव 
 
दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता उपचार करण्यासाठी बेडही कमी पडत आहेत. सर्वसामान्य रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाण्यास धजावत नाहीत. तेथे लाखांत बिल होत असल्याने शासनाने अधिगृहित केलेल्या रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी रुग्ण जात असले तरी तेथेही बेड कमी पडत आहेत.

दहा लाखांचे उत्पन्न चार लाखांवर; राज्यातील बाजार समित्यांचे संचालक चिंतेत
 
जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या आणि उपचाराअभावी होणारी रुग्णांची ससेहोलपट लक्षात घेऊन काशीळ आणि कोरेगाव रुग्णालयाच्या ठिकाणी आता प्रत्येकी 50 आयसीयू बेडची उभारणी होणार आहे. पण, ही संख्या पुरेशी नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जंबो कोरोना हॉस्पिटल उभारण्यासाठीचा निधी व परवानगीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. साधारण 50 कोटी रुपयांचे हे 500 बेडचे हॉस्पिटल यातून तातडीने उभारले जाणार आहे. मुळात हा प्रस्ताव यापूर्वीच पाठविणे आवश्‍यक होते. आता थोडा उशीर झाला असला तरी शासकीय पातळीवरून त्याला मंजुरी मिळून प्रत्यक्ष हॉस्पिटल उभारण्यास बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे रुग्णांची उपचाराविना ससेहोलपट सध्यातरी थांबणे अशक्‍य आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बोगस पदांची नेमणूक, लाखोंचा गैरप्रकार? 

त्यातच सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन शिथिल झालेले असले तरी शासनाच्या तिजोरीत अपेक्षित निधी येत नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून कोरोना हॉस्पिटलसाठी प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यासाठी अत्यावश्‍यक असलेल्या 50 कोटींच्या जंबो हॉस्पिटलच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे काय भूमिका घेणार, याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

कोरोनासंशयित ठोकताहेत धूम!, पोलिसांसह आरोग्य खात्याची पळापळ  

लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्‍यक... 

जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविलेल्या जंबो हॉस्पिटलच्या प्रस्तावास मंजुरी मिळून 50 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री, गृहराज्यमंत्र्यांसह सर्व आमदारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. तरच तातडीने हे हॉस्पिटल उभारले जाऊन वाढलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकणार आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यासाठी कोणती भूमिका घेणार, यावर या जंबो हॉस्पिटलचे भवितव्य अवलंबून आहे.

ठरलं तर! राज्यात 75 विशेष रोपवाटिकांची निर्मिती : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्वपूर्ण निर्णय

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty Crore Budget To Build Up Hospital In Satara