
सातारा : अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ग्राहकांना ‘शॉक’
कऱ्हाड - महावितरणने वीजबिलांसोबत ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिलही दिले आहे. त्यातून कोट्यवधी रुपये वीज ग्राहकांच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत. अगोदरचं महागाईने सामान्य ग्राहक होरपळत आहेत. भरमसाट वीजबिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच महावितरणने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ‘शॉक’ दिला आहे. त्यामुळे वीज ग्राहक हवालदिल झाले असून, ठेवीचे पैसे भरायचे कोठून हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे. कोरोना महामारीच्या संकटातून तावून सुलाखून निघाल्यावर सध्या कुठे तरी जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, तरीही अनेक कुटुंबांची आर्थिक घडी अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. अनेक कुटुंबे रोजगारासाठी भटकताना दिसत आहेत. अशा स्थितीत महागाईनेही डोके वर काढले आहे. सध्या इंधन दरवाढीच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. जीवनावश्यक साहित्याच्या किमतीही महागल्याने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामध्ये आता महावितरणनेही हातपाय पसरले आहेत. वीज ग्राहकांची पूर्वीपासून संचित असलेली अतिरिक्त सुरक्षा ठेव तशीच असताना कंपनीने नव्याने अतिरिक्त सुरक्षा ठेवीची बिले नुकतीच दिली आहेत.
महावितरणकडून बहुवर्षीय वीज दर विनिमय २०१९ नुसार वीज दर ठरवून मिळावेत, यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासंबंधी आयोगाने ३० मार्च २०२० रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ ते आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंतच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी बहुवर्षीय वीज दराचा आदेश जारी केला. त्यानुसार महावितरणच्या विविध ग्राहक वर्गवारीसाठी एक एप्रिल २०२० पासून लागू असणारे वीजदर निश्चित केले आहेत. सध्या एक एप्रिल २०२२ पासून लागू असलेल्या वीजदरानुसार महावितरणकडून वीजबिलांची आकारणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर सध्या वीज ग्राहकांना नियमित वीजबिलांसह अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिलही देण्यात येत आहे. वाढत्या महागाईत कुटुंबाचा खर्च भागवताना नाकीनऊ येत असतानाच महावितरणने वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीचा ‘शॉक’ दिला आहे. त्याचा मोठा आर्थिक भार वीज ग्राहकांवर पडून कोट्यवधी रुपये वीज ग्राहकांच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.
महावितरणकडून वीज ग्राहकांना सेवा देण्यात येते. त्यानंतर वीजबिल दिले जाते. त्यासाठी प्रत्येक ग्राहकांकडून सुरक्षा ठेव जमा केली जाते. वार्षिक वीजबिल वापराच्या सरासरीत जर या सुरक्षा ठेव रकमेपेक्षा १० टक्क्यांहून वाढ झाली, तर झालेली वाढ सुरक्षा ठेव रक्कम म्हणून वसूल करण्याची कायद्यात तरतूद आहे. या सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना प्रचलित दरानुसार व्याजही दिले जाते.
- रवींद्र बुंदेले, कार्यकारी अभियंता, महावितरण, सातारा.