esakal | कास : स्वतःचे अपूर्ण स्वप्न भावाच्या माध्यमातून पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

जळकेवाडीच्या श्रेयसचा ‘सीए’त झेंडा

स्वतःचे अपूर्ण स्वप्न भावाच्या माध्यमातून पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कास : अनेक विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातून मोठे यश संपादन करण्यासाठी निश्चयाचा मेरू उराशी बाळगून वर्षानुवर्षे अभ्यास करत स्पर्धा परीक्षा देतात. मात्र, अपयश येताच आपली दिशा बदलतात. त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा भंग होतो. मात्र, सातारा तालुक्याच्या परळी खोऱ्यातील दुर्गम जळकेवाडी गावच्या युवकाने आपल्या भावाला आलेल्या अपयशाने खचून न जाता भावाच्या सहकार्याने आणि प्रेरणेने भावाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी ‘सीए’ बनत यशाचा झेंडा रोवला आहे.

हेही वाचा: ‘लखीमपूर’च्या निषेधार्थ आज महाराष्ट्र ‘बंद’

जळकेवाडी हे अतिदुर्गम गाव. गावात अद्याप प्राथमिक शाळाही नाही. मात्र, निरक्षर असणाऱ्या आई मनाबाई व वडील ठकुजी शिंदे यांनी आपली शेती, जनावरे सांभाळत आपल्या मुलांना साक्षर होण्यासाठी मुलांच्या वयाची पाच वर्षे पूर्ण होताच गावापासून २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, बामणोली येथे शिक्षणसाठी पाठविले. याच शाळेत मुलांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी व घरची बेताची परिस्थिती असल्याने ‘पार्टटाइम’ काम करत शिकण्यासाठी मुलांनी मुंबईकडे नातलगांच्या आधाराने धाव घेतली. प्रथम मोठा भाऊ लक्ष्मण याने काम करत ‘सीए’ होण्याचा निश्चय केला. मात्र, तीन वेळा परीक्षा देऊनही अपयश आल्याने व घरची जबाबदारी वाढल्याने त्याने माघार घेत भावाला ‘सीए’ करण्याचा निश्चय केला. भाऊ श्रेयस शिंदेनी दादाच्या सूचनांचे पालन करत दहावीनंतर मुंबईमध्ये दिवसभर काम करून नाईट कॉलेजमध्ये अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्या पुढीलही शिक्षण मुंबईमध्येच पूर्ण करून ‘सीए’ होण्याचा अभ्यास सुरू केला. सलग पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाने दुसऱ्या वेळच्या ‘टर्म’मध्ये ‘सीए’ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण होत आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण केले.

"आई-वडिलांच्या आशीर्वादाने भावाच्या मार्गदर्शनाखाली कष्ट केले. क्लासच्या फीसहित सर्व खर्चाची जबाबदारी भावाने उचलल्यानेच हे मोठे यश संपादन करत भावाचे स्वप्न साकार करता आले. आपण ज्या क्षेत्रात निश्चयाने ऊडी घेतो, त्याचा शेवट हा नक्की असतोच. अपयश हे सर्वांनाच येते. मात्र, एखाद्या अपयशाने खचून न जाता विद्यार्थांनी त्याच्या शेवटापर्यंत जावे."

- श्रेयश शिंदे, जळकेवाडी (सीए)

loading image
go to top