बेजाबदार सातारकर; मास्क हनुवटीवर अन्‌ पिचकारी रस्त्यावर!

बेजाबदार सातारकर; मास्क हनुवटीवर अन्‌ पिचकारी रस्त्यावर!

सातारा : कोरोना कमी झाला असेलही; पण तो संपलेला नाही. याची तमा न बाळगता वाढत्या गर्दीतही नागरिक बेजबाबदारपणे वागू लागले आहेत. परिस्थिती फारशी बदलेली नाही, तरीही नाकावरचा मास्क हळहळू जागा बदलू लागला आहे. काहीजण मास्क लावत नाहीत, काही जण फक्त तोंडावर ओढतात, तर काही नागरिक मास्क हनुवटीवर घेऊन बिनधास्त वावरत असून, सामाजिक स्वास्थ्याची तमा न बाळगता रस्त्यावर पिचकाऱ्या मारणारेही भरपूर आढळत आहेत.
 
कोरोनाच्या संकटाला सुरवात होऊन आता सात महिने होऊन गेले. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाउनच्या सुरवातीपासूनच आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांचे विविध प्रकारे प्रबोधन केले जात होते. मोबाईल ट्यूनपासून ते पोस्टरपर्यंत अन्‌ अगदी ध्वनिक्षेपक लावलेल्या गाड्या गावोगावी, वाड्यावस्त्यांवर फिरून नागरिकांनी काय दक्षता घ्याव्यात याच्या सूचना दिल्या जात होत्या, तसेच कोरोनाबाधा जवळच्यांना झाली, की किती वाईट अवस्था होते. लाखो रुपये उपचारावर खर्च होतात याची जाणीवही नागरिकांना झाली होती, तरीही कोरोनाचा प्रसार वाढतच होता; एकूणच सामाजिक सुरक्षेसाठी मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, सण समारंभ एकत्र येऊन साजरे न करणे अशा सूचनांचे पालन नागरिक कसोशीने करत होते.

फलटणात रस्त्यासाठी सर्वपक्षीय रस्त्यावर; खासदार निंबाळकरांचा उपोषणास पाठिंबा

नागरिक घेत असलेली दक्षता, घरोघरी केलेल्या तपासण्या, सततच्या प्रबोधनाने नागरिकांत वाढलेली कोरोनाबाबतची जागरूकता यामुळे या महिन्यात राज्यात आणि जिल्ह्यातही कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, कोरोना संपलेला नाही. कोरोनाची लाट पुन्हा येण्याची शक्‍यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत; पण अनेक नागरिक कोरोना गेलाच अशा अविर्भावात बिनधास्त वागू लागल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. मास्कचा वापर, रस्त्यावर पिचकाऱ्या मारणे याबाबत अनेक नागरिक हलगर्जीपणा करू लागले आहेत.
 
बाजारपेठ, बस स्थानक, एसटीत अगदी गर्दीतही नागरीक नाका तोंडावर लावायचा मास्क हनुवटीवर आणत आहेत. रस्त्यावर पिचकाऱ्या मारणेही सुरूच आहे. यातून कोरोना विषाणूचा प्रसार होतो, बाधा होऊ शकते हे सारे अनेक नागरिक विसरून गेल्याचे जाणवत आहे. आता तर दिवाळीसारखा मोठा सण आहे. बाजारपेठेत गर्दी ही वाढणारच आहे. मास्क न लावल्यास 500 रुपये दंड आहे, तर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई होऊ शकते. दिवाळीच्या गर्दीच्या काळात तरी नागरिकांनी कायद्याच्या धाकाने नव्हे तर मनाने व सर्वांच्या हितासाठी कोरोना प्रसार होऊ नये यासाठीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. 

लालपरीवर अवतरली गड-किल्ल्यांची रेखाचित्रे

दीपावली सणानिमित्ताने व इतर कामांच्या निमित्ताने नागरिकांनी इतरत्र वावरताना सुद्धा कायमस्वरूपी चेहऱ्यावर मास्क वापरणे, प्रवासादरम्यान व इतर सर्व ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जारी केले आहेत.

बाजारपेठेमध्ये खरेदी करतेवेळी ग्राहकांनी चेहऱ्यावर मास्क घालणे, दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी आदेशात नमूद केले आहे.

बहरणा-या पर्यटनासाठी महाबळेश्वर पालिका सज्ज : पल्लवी पाटील

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com