
वन विभागाच्या अखत्यारीत करावयाच्या विविध कामांत गैरप्रकार आणि अनागोंदी झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. वन विभागाकडून झालेल्या मृदू व जलसंधारणाच्या कामांचे वाटप ठराविक मजूर सोसायट्या आणि मर्जीतील अभियंत्यांना करण्यात येत असल्याचे यातून उघड झाले आहे. याबाबतच्या तक्रारी झाल्यानंतर वन विभागातील टक्केवारीचा वणवा समोर आला आहे. कामे वाटपादरम्यान टोलच्या नावाखाली मर्यादेपेक्षा जास्तीचा प्रोटोकॉल पाळण्यात आल्याची चर्चा आहे. चर्चेच्या खोलात जाऊन वन विभागातील ही अनागोंदी उघड करणारी वृत्तमालिका आजपासून...
-गिरीश चव्हाण
सातारा : वन विभागाच्या अखत्यारीत गॅबियन बंधारे, चेक डॅम, माती बंधारा, मृदू व जलसंधारणाच्या विविध कामांसह वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनासह वनराई संगोपनासाठीची अन्य कामे मोठ्या प्रमाणात दरवर्षी करण्यात येतात. यासाठीचा निधी विविध योजनांतून तसेच जिल्हा नियोजन समितीकडूनही त्या विभागास उपलब्ध होत असतो.