वंदनगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी पाठपुरावा करू - देवेंद्र फडणवीस

विलास साळूंखे 
Friday, 4 September 2020

शिववंदनेश्वर प्रतिष्ठान व आरंभ फाउंडेशनच्या वतीने वंदनगड संवर्धनासाठी विधान परिषदेत चर्चा घडवून आणणेबाबत श्री. फडणवीस यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. या निवेदनात वंदनगडाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने विशेष तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भुईंज ( सातारा) : पूर्वीही गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष लक्ष दिले होते. आताही विधान परिषदेत चर्चा घडवून वंदनगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री विराेधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ईशान भोसले व त्यांच्या शिष्टमंडळाला दिली. 

शिववंदनेश्वर प्रतिष्ठान व आरंभ फाउंडेशनच्या वतीने वंदनगड संवर्धनासाठी विधान परिषदेत चर्चा घडवून आणणेबाबत श्री. फडणवीस यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. या निवेदनात वंदनगडाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने विशेष तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. 1642 मध्ये जिंकून स्वराज्याची सुरवात केली होती, असे पुरावे व दाखले प्रतिष्ठानकडे आहेत. 

महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी, इतिहासप्रेमींसाठी किल्ले वंदनगड हा जिव्हाळ्याचा विषय आहे. विरोधी पक्षनेते म्हणून शिवप्रेमी, गडकोट किल्ले, दुर्गप्रेमी व इतिहासप्रेमींच्या भावना विचारात घेऊन किल्ले वंदनगड संवर्धनासाठी राज्य सरकारशी चर्चा करून विशेष तरतूद करण्यास भाग पाडावे, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष ईशान भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केले.

किल्ले वंदनगडावर दर रविवारी शिवप्रेमी, दुर्गप्रेमींसह शिववंदनेश्वर प्रतिष्ठान उत्स्फूर्तपणे श्रमदान करून डागडुजी करत आहे. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने तातडीने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Chief Minister Opposition Leader Devendra Fadnavis said that he will follow up for the conservation of Vandangad fort