धर्मावर आधारित हुकूमशाहीचा धोका

किरण बाेळे
Saturday, 28 November 2020

सातारा जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आहे. त्यामुळे भविष्यात येऊ घातलेला धोका वेळीच ओळखून या निवडणुकीसाठी मतदान करणे आवश्‍यक आहे, असे स्पष्ट करून श्री. चव्हाण म्हणाले

फलटण शहर (सातारा) : देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कॉंग्रेसने दिलेली राज्यघटना यांना मान्य नाही. घटना निष्प्रभ करून ते घटना व लोकशाही संपवायला लागले आहेत. त्यांना धर्मावर आधारित असलेली हुकूमशाही देशात आणायची आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे.
 
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कॉंग्रेस पुरस्कृत शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व राष्ट्रवादी पुरस्कृत पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे नुकत्याच झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर होते. या वेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार दीपकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सुभाषराव सूर्यवंशी-बेडके, ऍड. उदयसिंह पाटील, रणजित लाड, सचिन सूर्यवंशी-बेडके, रणजितसिंह देशमुख, डॉ. सुरेश जाधव, मनोहर शिंदे, महेंद्र सूर्यवंशी, राजेंद्र शेलार आदींची उपस्थिती होती.
 
सातारा जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आहे. त्यामुळे भविष्यात येऊ घातलेला धोका वेळीच ओळखून या निवडणुकीसाठी मतदान करणे आवश्‍यक आहे, असे स्पष्ट करून श्री. चव्हाण म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था कोसळायला लागली आहे. असलेले कारखाने बंद पडत आहेत. नवीन सुरू होत नाहीत. त्यामुळे रोजगार निर्माण होणार तरी कसा? गेल्या 45 वर्षांत बेरोजगारीचा सर्वात जास्त दर या वर्षी पाहावयास मिळाला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोव्हिड पूर्वीच कोसळली आहे. मोदी सरकारने नोटबंदी, जीएसटीसारखे हल्ले केल्याने कोविडपूर्वीच अर्थव्यवस्था 3.1 टक्‍क्‍यापर्यंत खाली आली. युपीए सरकारच्या काळात विकासदर साडेनऊ टक्के होता. ही निवडणूक भाजपला रोखायची निवडणूक आहे. महाआघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे.
 
यावेळी महेंद्र सूर्यवंशी-बेडके यांनी स्वागत केले. सचिन सूर्यवंशी-बेडके यांनी प्रास्ताविक केले. तसेच यावेळी (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना व घटक पक्षांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Chief Minister Prithviraj Chavan has accused the BJP of not accepting the constitution given by Dr.Babasaheb Ambedkar and the Congress