
स्ट्रॉबेरीची वाहतूक करणाऱ्या गाडीचा पसरणी घाटात मोठा अपघात झाला आहे.
पसरणी घाटात स्ट्रॉबेरी घेऊन जाणाऱ्या गाडीची कारला जोरदार धडक; चारजण जखमी
भिलार (सातारा) : वाई-पांचगणीच्या पसरणी घाटात (Pasrani Ghat) स्ट्रॉबेरी (Strawberry) वाहतूक करणारी पीकअप गाडी आणि पर्यटकांची गाडी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होवून अपघात झालाय. या अपघातात दोघेजण जखमी झालेत, तर गाडीतील स्ट्रॉबेरीचं मोठं नुकसान झालंय.
याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून (Panchgani Police Station) मिळालेली माहिती अशी, भिलार येथील स्ट्रॉबेरी पुण्याकडं घेवून जाणारी पीकअप गाडी क्रमांक एम्एच ११ डीडी ०३४४ ही घाटातून वाईकडं चालली असताना, अचानक वाईहून पांचगणीकडं पर्यटनासाठी येणारी गाडी क्रमांक एम्एच ०१ एएक्स ७६५७ हिनं पीकअपला जोरदार धडक दिली. यामध्ये पीकअप गाडी पलटी झाली. यात पीकअप चालक प्रशांत अरविंद भोसले (खंडाळा) व त्याच्यासोबतचा एकजण जखमी झालाय. अपघातात स्ट्रॉबेरीचं मोठं नुकसान झालं असून गाडी चालक पळून गेलाय.
या घटनेची माहिती मिळताच पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार अरविंद माने, पोलिस कॉन्स्टेबल नितीन कदम, सचिन आदमाने, शिवशंकर शेळके, सागर नेवसे, बोराडे यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली. यामध्ये दोन्ही गाड्यांमधील चारजण जखमी झाले आहेत. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताची नोंद सुरू होती.