Satara : ‘एफआरपी’ वरून पेटणार रान? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

Satara : ‘एफआरपी’ वरून पेटणार रान?

सातारा : जिल्ह्यातील काही कारखान्यांची एफआरपी पूर्ण झाली नसतानाही कारखान्यांनी नवीन हंगामाची तयारी सुरू केली आहे. या गाळप हंगामात तरी एफआरपीचे तुकडे होऊ नयेत, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. पण, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने त्याची तोडणी वेळेवर होण्यासासाठी शेतकऱ्यांकडून विरोध होत नाही. मात्र, शेतकऱ्यांची बाजू घेत शेतकरी संघटनांनी भूमिका मांडल्यास कारखानदारांना नमते घेऊन शेतकऱ्यांना मागील शिल्लक व तसेच एकरकमी एफआरपीची रक्कम मिळू शकेल.

जिल्ह्यातील किसन वीर, प्रतापगड, खंडाळा कारखान्यांसह १६ कारखान्यांची गाळप हंगामाची तयारी सुरू आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर काही कारखाने बॉयलर अग्नी प्रदीपन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू होणार, हे निश्चित आहे. गाळपासाठी यावर्षी एक कोटी मेट्रिक टनांपेक्षाही अधिक ऊस गाळप होणार आहे. त्यानुसार काही कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली आहे. काहींनी जास्त प्रमाणात ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध केली आहे. मागील हंगाम जूनपर्यंत चालला असला तरी, यावर्षी परिस्थिती वेगळी आहे.

उसाचे क्षेत्र जास्त असले तरी वाढीव तीन कारखाने गळीत करणार असल्याने यावेळेचा हंगाम एप्रिलअखेर संपण्याची चिन्हे आहेत. यामुळे ऊस न तुटण्याची भीती कमी राहणार आहे. मात्र, मागील हंगामातील एफआरपी पूर्ण झालेली नाही. कायद्याने एफआरपी पूर्ण करणे बंधनकारक असतानाही, कारखाने याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. आता हंगामाच्या सुरवातीलाच शेतकरी संघटनांनी मागील देणी पूर्ण करा, मगच हंगाम सुरू करा, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे एफआरपीचे तुकडे करण्यास यावर्षीही शेतकऱ्यांचा विरोध आहे.

पण, ऊस जास्त प्रमाणात असल्याने वेळेत तोडणी होण्यासाठी शेतकरी एफआरपी विरोधात बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे कारखान्यांची मनमानी होत आहे. आता शेतकरी संघटनांनीच ठोस भूमिका घेऊन आंदोलनाचे हत्यार उपसले तर कारखानदार मागील देणी देण्यास तयार होणार आहेत. पण, मागील हंगामाची स्थिती पाहता कारखानदारांची यावर्षीही एफआरपीचे तुकडेच करण्याची मनःस्थिती दिसत आहे. यावर साखर आयुक्त काय भूमिका घेणार? शेतकऱ्यांच्या पदरी काय पडणार? हे हंगाम सुरू झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Frp Farmer Sugarken Factories Aggressive Organization Satara District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..