मोरांचे जवळून दर्शन घ्यायचेय? मग चला "मिनी महाबळेश्वर'ला!

Satara
Satara
Updated on

बुध (जि. सातारा) : खटाव-माण तालुक्‍याला जोडणाऱ्या राजापूर-दहिवडी मार्गावरील गणेश खिंड परिसर मिनी महाबळेश्वर म्हणून उदयास येत आहे. हिरव्यागार वनराईने नटलेले डोंगर, दऱ्याखोऱ्यांतून खळखळणारे पाणी, भरलेले तलाव, थंडगार वारा, डोंगरांगांतून जाणारा नागमोडी रस्ता, भिरभरणारी पवनचक्‍क्‍यांची पाती, करवंदांच्या जाळ्या, हिरवीगार वनराई, पक्ष्यांचा सतत किलबिलाट आणि मियॉंव, मियॉंव चा गजर करत थुई-थुई नाचणारे मोर. मोरांचे जवळून दर्शन घडविणारा हा नयनरम्य परिसर मानवी मनाला भुरळ घालत आहे. 

निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले आता गणेश खिंड परिसराकडे वळू लागली आहेत. "नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा' हे जुने गीत लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते. मात्र, अनेकांना मोर प्रत्यक्ष पाहता येत नाहीत. याला राजापूर (हनुमानगर) परिसर अपवाद ठरतो आहे. जरांबी तलावाच्या पूर्वेला थेट गणेश खिंडीपर्यंतचा परिसर मोर आणि अन्य जिवांचे नैसर्गिक निवाऱ्याचे स्थान बनले असून, येथे मोठ्या संख्येने मोर वास्तव्यास आहेत. या जंगल विभागाला लागून राजापूर व हनुमाननगरातील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. तर काही शेतकरी वस्त्या करून राहिले आहेत. 

मोरांविषयी येथील शेतकऱ्यांना खूप आत्मीयता आहे. मोर हा संवेदनशील पक्षी असल्याने त्याला त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी येथील ग्रामस्थ घेत आहेत. मोरांनी कधी शेतीचे नुकसान केले तरी शेतकरी त्यांना हटकत नाहीत. मानसापासून आपल्याला धोका नाही, याची जाणीव मोरांनाही झालेली असल्याने कित्येकदा घराच्या पटांगणात कोंबड्या फिरतात तसे मोर फिरताना दिसतात. दिसायला अत्यंत देखणा, आकर्षक असलेला हा पक्षी या परिसराचे वैभव असून, त्यांची संख्या अंदाजे 20 ते 25 असल्याचे येथील शेतकरी दीपक घनवट सांगतात. गेल्या दहा वर्षांपासून मोरांचे स्थानिक ग्रामस्थांकडून संरक्षण केले जात आहे. दुष्काळातही त्यांना अन्न, पाणी पुरविण्यात आल्याने मोरांना येथील मानवी वस्ती सुरक्षित वाटू लागलेली आहे. त्यामुळे मोर परिसरातील वस्त्यांवर मुक्तपणे बागडताना दिसत आहेत. 

जलशिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याच्या संवर्धनाबरोबरच वृक्षारोपण मोहिमेमुळेही हा परिसर गर्द वनराईने बहरला आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी जलशिवार कामानिमित्त या परिसरास भेट दिली होती. मोरांचे वास्तव्य आणि येथील निसर्गसौंदर्य पाहून तेही भारावून गेलेले होते. येथील मोरांचे संवर्धन व त्यांच्या संरक्षणासाठी शासन स्तरावर ठोस उपक्रम राबविण्याची त्यांनी ग्वाही दिलेली होती. मात्र, त्यानंतर त्यांची अचानक बदली झाली. आश्‍चर्य म्हणजे मोरांच्या संवर्धन व संरक्षणासाठी आजपर्यंत शासन, वन विभाग, किंवा एखादी स्वयंसेवी संस्था पुढे आलेली नाही. हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्यात नाचणारे मोर पाहाणे म्हणजे पर्वणीच असते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी व पर्यटक थोडावेळ का होईना थांबून कॅमेऱ्यांमध्ये हे विलोभनिय दृश्‍य टिपण्यासाठी अधीर झालेले असतात. 


पाण्यामुळे उसासह मोरांच्या संख्येत वाढ! 

पाण्याच्या उपलब्धतेमुळे उत्तर खटाव परिसरात उसाचे क्षेत्र वाढीस लागले आहे. त्यामुळे ललगुण, नागनाथवाडी, शिंदेवाडी, फडतरवाडी, काटेवाडी, नेर व नेर तलाव परिसरातही मोरांची मोठी संख्या निर्माण झालेली आहे. निसर्गप्रेमींच्या मनाचा पिसारा फुलविणारा व बालगोपालांना हवाहव्याशा वाटणाऱ्या मोरांविषयी कुतूहल असलेले होशी पर्यटक या परिसराला भेट देतात. मात्र, मोरांची संख्या अशी टिकून राहावयाची असेल तर हा भाग पर्यटनापासून दुर राहिला पाहिजे अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी 
व्यक्त करत आहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com