Mahabaleshwar News : दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत जनरेटरला आग; नऊ जण होरपळुन जखमी

दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत जनरेटरला आग; नऊ जण होरपळुन जखमी.
Fire
Fireesakal

महाबळेश्वर - दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत जनरेटरला आग लागल्याने भडकलेल्या आगीत मिरवणुकीत सहभागी झालेली तीन ते सात वयोगटातील सात लहान मुले व दोन तरूण अशी एकुन नऊ जण आगीत होरपळुन जखमी झाली.

आगीत जखमी झालेल्या मुलांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपचारासाठी येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. या मध्ये तीन मुलांची स्थिती गंभिर असुन त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या कोळी आळी येथील दुर्गामाता उत्सव समितीच्या ट्रॅक्टर वर मंगळवारी आठच्या दरम्यान जनरेटर शेजारी ठेवलेला प्लास्टिकचा पेट्रोलने भरलेल्या कॅन वितळून भडकलेल्या आगीमुळे एकदम तारांबळ उडाली.

यामध्ये अलिना सादिक नदाफ (वय-६ वर्षे) समर्थ सनी सपकाळ (वय-७ वर्षे) शिवांश संजय ओंबळे (वय-४ वर्षे) ओवी पवन पॉल (वय साडे चार वर्षे) आराध्या प्रशांत भोसले (वय-4 वर्षे) संस्कृती सुनिल वाडकर (वय-4 वर्षे) साईशा अमित पवार (वय-4 वर्षे) तसेच मुलांना वाचविताना आशितोष यशवंत मोहीते (वय-19 वर्षे) कुणाल किशोर राउत (वय-24) रा. सर्वच रा. कोळी आळी, महाबळेश्वर, ही सर्व जखमी झाली आहेत.

शहरात सायंकाळ पासुन विविध मंडळाच्या मुर्ती विसजर्नासाठी बाजारपेठेत रांग लावुन विसर्जन विहीरीकडे मार्गक्रमण करीत होत्या. सायंकाळी साडे सात वाजता डिजेच्या दणदणाटात कोळी आळी येथील दुर्गामाता उत्सव समितीची दुर्गा मुर्तीची मिरवणुक सुरू झाली. मंडळाचे कार्यकर्ते डि.जे समोर नाचत होते. डिजेच्या भिंत्ती मागे एका लहानशा ट्रॅक्टरवर दुर्गामातेची मुर्ती होती.

या मुर्ती जवळ आशितोष मोहीते होता तर, मुर्तीच्या पाया जवळ साधारण 12 ते 15 लहान मुले बसली होती. याच ट्रॉलीवर जुना जनरेटर चालु होता तर, त्या जनरेटर शेजारी एक ४ लीटरचा पेट्रोलचा कॅन होता. जनरेटरची इंधनाची पाईप गंजली होती. तिथेच शेजारी पेट्रोलचा कॅन होता. तो तेथील उष्णतेमुळे वितळला त्यामुळे पेट्रोल पसरले व जनरेटरने पेट घेतला. त्यावर काही जणांनी पाणी ओतल्याने पेट्रोल सर्वत्र पसरले. या आगीत सर्व लहान मुले वेढली गेली.

मुलांच्या अंगावरील सर्व कपडयांनी पेट घेतला. मुले होरपळु लागल्याने एकच कल्लोळ सुरू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली. साधारण नऊ दहा वर्षांच्या मुलांनी ट्रॅक्टर वरून उडया मारल्या परंतु लहान मुलांना उडया मारून बाहेर पडता आले नाही. मुले आगीत होरपळत असल्याचे आशितोष मोहीते याने पाहीले व क्षणाचाही विलंब न लावता त्याने स्वतःला आगीत झोकुन दिले.

आगीत पेटत असलेली मुले त्याने ट्रॅक्टर मधुन काढुन बाहेर असलेल्या लोकांच्या हवाली करण्यास सुरूवात केली. आशितोष याच्या मदतीला कुणाल राउत व राहुल यादव हे धावुन आले. त्यांनी या मुलांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. अनेक गोंधळ सुरू होताच डि.जेच्या समोर असलेली मुले मदतीसाठी धावुन आली. काहींनी रूग्णवाहीका सांगितल्या तर, काहींनी आपली वाहने सज्ज केली.

परंतु एका बाजुला डिजेची भिंत्त तर दुसरीकडे रस्त्यावर मंडळाचा मंडप होता त्या मुळे घटना स्थळा पर्यंत वाहन पोहोचू शकले नाही. अनेक तरूणांनी मुलांना हातावर घेवुन धावतच वाहनात बसविले व सर्व मुलांना येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी मुलांचा व त्यांच्या नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू होता. रूग्णालयाचा परीसरात मोठया प्रमाणाावर गर्दी जमली.

घटनेची माहीती समजताच माहीती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप भागवत हे आपल्या कर्मचारी यांच्यासह तातडीने रूग्णालयात पोहोचले. माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर, माजी नगरसेवक संतोष शिंदे, हेमंत साळवी, प्रेषित गांधी, संतोष पवार, रविंद्र केंडे, ॲड. संजय जंगम, अतुल सलागरे, रविंद्र कुंभारदरे, कुमार शिंदे तसेच कोळी आळी येथील मंडळाचे असंख्य पदाधिकारी या वेळी ग्रामिण रूग्णालयातील बचाव कार्यात सहभागी झाले होते.

ग्रामिण रूग्णालयात सर्व मुलांवर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. परंतु रूग्णांची संख्या मोठी असल्याने व या ठिकाणी तातडीची सेवा उपलब्ध नसल्याने नागरीकांनी आपली मुले पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविली. सातारा येथील एका खाजगी रूग्णालयात सर्व जखमींना दाखल करण्यात आले.

या घटनेची माहीती मिळताच सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम हे देखिल सातारा येथील रूग्णालयात पोहोचले. त्या पाठोपाठ सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे देखिल रूग्णालयात पोहोचले. त्यांनी रूग्णालयातील वैदयकिय अधिकारी यांच्या बरोबर चर्चा केली व आवश्यक ती सर्व मदत करण्यास सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या पाठोपाठ आमदार मकरंद पाटील हे देखिल रूग्णालयात पोहोचले. त्यांनी देखिल सर्व रूग्णांची भेट घेतली. रूग्णालयातील डाॅक्टरांशी उपचारा बाबत चर्चा केली. जखमी मुलांचे नातेवाईक बचाव कार्य करणारे कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी हे रूग्णालयात पोहोचल्याने सातारा येथे देखिल नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.

महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांनी देखिल सातारा रूग्णालयात धाव घेवुन रूग्णांची भेट घेवुन नातेवाईकांशी संवाद साधला. या आगीत जास्त जखमी झालेले समर्थ सपकाळ, अलिना नदाफ व शिवांश ओंबळे यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे तातडीने हलविण्यात आले. पुणे येथील सुर्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

कोळी आळी येथे दुर्घटना घडली तेव्हा बाजारपेठेत डि.जेचा दणदणाट ढोलताशांचा गजर तर, महीलांचा दांडीया सुरू होता. कोणालाच या बाबतचे सोयर सुतक नव्हते. कोणालाच काही वाटत नव्हते. कोणत्याही मंडळाने आगीत जखमी झालेल्या मुलांची ही घटना गांभिर्याने न घेता आपला उत्साह चालुच ठेवला होता. रात्री उशीरा पर्यंत ही दुर्गामाता विसर्जन मिरवणुक चालु होती.

मंडळाच्या पदाधिकारी यांनी दाखविलेल्या या असंवेदनशीलते बाबत शहरातुन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे. डिजेच्या दणदणाटा बाबतही प्रशासनाच्या कोरडया भुमिकेवर देखिल शहरातुन जोरदार टिका केली जात आहे. प्रशासनाने डी.जेच्या आवाजा बाबत दाखविलेल्या अनास्थेची चर्चा देखिल शहरात सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com