भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडीची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूगर्भ शास्त्रज्ञ

सातारा : भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडीची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी

केळघर (सातारा) : गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळघर विभागातील भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडी या गावांना भूस्खलनाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला होता. आज केंद्र सरकारच्या भूगर्भ शास्त्रज्ञांनी या गावांची पाहणी केली. जावळी तालुक्याच्या पश्चिम विभागातील या तीन गावांत डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले होते.

दरडी, कडे कोसळले होते. नदीपात्रात असलेल्या शेतजमिनीत मोठ्यामोठ्या दगडी आल्या होत्या. नद्या, ओढ्यांनी प्रवाह बदलल्याने शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. शेती वाहून गेल्याने या तीनही गावांतील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने या तीनही गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या गावांतील ग्रामस्थांनी केली होती.

अतिवृष्टीमुळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन कसे झाले, याचा अभ्यास करण्यासाठी आज केंद्र शासनाच्या वतीने भूगर्भशास्त्रज्ञांनी वाहिटे, भुतेघर, बोंडारवाडी या गावांची पाहणी केली. या वेळी या पथकात परिमिता, रिंपी गागई यांचा समावेश होता. या वेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, मंडलाधिकारी ए. आर. शेख, तलाठी मकरध्वज डोईफोडे, भुतेघरचे सरपंच अंकुश मानकुमरे, विष्णू मानकुमरे, वाहिटेचे राजाराम जांभळे, बोंडारवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदार पोळ यांनी पथकाला माहिती दिली.

loading image
go to top