कौतुकास्पद! लग्नाच्या दिवशी नवरीसह वरात गेली मतदानाला !

राजेंद्र वाघ 
Tuesday, 1 December 2020

विवाहाच्या धामधुमीत मतदान करणे राहू नये, म्हणून वेळेचे योग्य नियोजन करून विवाह मुहूर्ताच्या आधीच नियोजित वधू पूनम, वधुपिता राजाभाऊ, करवला दिग्विजय व करवली मयुरी, असे एकाच कुटुंबातील चौघे मतदार कोरेगाव येथील मतदान केंद्रावर पोचले आणि या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोरेगाव (सातारा)  : येथे आज (मंगळवारी) सायंकाळच्या मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विवाहपूर्व धामधुमीतही वधू असलेल्या कोरेगावच्या सभापतींच्या मुलीने वडील व दोघा भावंडांसह कोरेगाव येथील केंद्रावर जाऊन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदानाचा हक्क बजावला.

कोरेगावचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांची मुलगी पूनम हिचा आज विवाह. त्यामुळे त्यांच्या कुमठे येथील लग्न घरात सकाळपासूनच तसेच मंगल कार्यालयात दिवसभर विवाहपूर्व धामधूम सुरू आहे. दरम्यान, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान देखील आज सकाळपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सभापती जगदाळे यांच्या घरात 'पदवीधर'च्या निवडणुकीचे सहा मतदार असून, त्यात स्वत: राजाभाऊ, आज विवाह असलेली त्यांची मुलगी पूनम तसेच पूनमचा भाऊ दिग्विजय, बहिण मयुरी यांच्यासह सहा जणांचा समावेश आहे.

विवाहाच्या धामधुमीत मतदान करणे राहू नये, म्हणून वेळेचे योग्य नियोजन करून विवाह मुहूर्ताच्या आधीच नियोजित वधू पूनम, वधुपिता राजाभाऊ, करवला दिग्विजय व करवली मयुरी, असे एकाच कुटुंबातील चौघे मतदार कोरेगाव येथील मतदान केंद्रावर पोचले आणि या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला.

संपादन - सुस्मिता वडतिले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A girl from Koregaon has exercised her right to vote in the graduate constituency despite her own marriage