दुष्‍काळी भागात वाढली भूजल पातळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ground water

दुष्‍काळी भागात वाढली भूजल पातळी

गोडोली - गेल्या चार-पाच वर्षांत पाणी अडवण्याचे व मुरवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याने या वर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाच्या पिण्याच्या पाण्यासाठी खर्च कमी होणार असून ग्रामीण भागातील लोकांचे पाण्यासाठीचे हालही कमी होतील, अशी स्थिती आहे. त्यातच यावर्षीचा मॉन्सूनचा पाऊस आठवडाभर लवकर येण्याचे संकेत असल्याने तसेच मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने पुढील काळातील पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. मात्र, महाबळेश्वर, पाटण व फलटण तालुक्यांत सरासरीने भूजल पातळीत घट झाल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डब्ल्यू. जे. बनसोडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील भूजल पातळी निरीक्षणासाठी तालुकानिहाय विहिरींची संख्या पुढीलप्रमाणे : जावळी (१), कऱ्हाड (१५), खटाव (१७), कोरेगाव (९), माण (१६), महाबळेश्वर (३), पाटण (१०), फलटण (१२), सातारा (१०), वाई (८) अशा १०६ विहिरी निश्चित केल्या आहेत. यावर्षी भूजल पातळीत जावळी ०.१० मीटर, कऱ्हाड ०.२२ मीटर, खंडाळा ०.२९ मीटर, खटाव १.८७ मीटर, कोरेगाव ०.७० मीटर, माण १.०४ मीटर, सातारा ०.६४ मीटर, वाई ०.९८ मीटरने वाढ झाली आहे. मात्र, महाबळेश्वर ०.३८ मीटर, पाटण ०.३१ मीटर व फलटण ०.६२ मीटरची घट झाली आहे.

यावरून दुष्काळी पट्ट्यात झालेला समाधानकारक पाऊस व त्या परिसरात झालेले पाणी अडवण्याचे व जिरवण्याचे काम समाधानकारक आहे. त्यासाठी शासन, नाम फाउंडेशन, रविशंकर फाउंडेशन व स्थानिक समाजसेवी संस्था, त्या गावातील ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळांनी यासाठी दिलेल्या योगदानाचे हे दृश्य परिणाम आहेत. अजूनही सर्व तालुक्यांत पाणी अडवण्यासाठी व मुरवण्यासाठी संधी आहे. त्यामुळे येत्या काळात पाणी अडवण्याचे व मुरवण्याचे प्रयत्न झाल्यास पिकासाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई भासणार नाही.

Web Title: Ground Water Lavel Increased In Satara District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top