मेडिकल कॉलेजसाठी हालचाली गतीमान; पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

गिरीश चव्हाण
Saturday, 17 October 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचा आढावा घेतला होता. आढाव्यादरम्यान जागेचा प्रश्‍न प्रलंबित असल्याचे समजल्यानंतर तत्काळ कार्यवाहीचे आदेश जलसंपदा आणि आरोग्य विभागास दिले होते. यानुसार दोन्ही विभागांची संयुक्‍त बैठक होऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची जागा हस्तांतरित करण्यात आली.

सातारा : जलसंपदा विभागाची जागा हस्तांतरित झाल्याने येथे होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठीच्या प्रशासकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. याच अनुषंगाने शुक्रवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. 

या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जलसंपदा विभागाचे तसेच सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता व त्यांचे सहकारी, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, तहसीलदार आशा होळकर व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचा आढावा घेतला होता. आढाव्यादरम्यान जागेचा प्रश्‍न प्रलंबित असल्याचे समजल्यानंतर तत्काळ कार्यवाहीचे आदेश जलसंपदा आणि आरोग्य विभागास दिले होते. यानुसार दोन्ही विभागांची संयुक्‍त बैठक होऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची जागा हस्तांतरित करण्यात आली. जागेचा प्रश्‍न निकाली निघाल्यानंतर त्याच्या उभारणीसाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीचा आराखडासुध्दा वित्त व नियोजन विभागास सादर करण्यात आला. त्यावरील कार्यवाही सुरू असून, शुक्रवारी पालकमंत्री पाटील यांनी पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने सुरू असणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला.

कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कावीळ, जगच दिसू लागलंय पिवळं : नगराध्यक्षांचा सडेतोड पलटवार 

यानंतर पालकमंत्री पाटील यांनी श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलाला भेट देवून या संकुलातील विविध मैदानांची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी क्रीडा संकुलातील मुख्य मैदान, बास्केटबॉल मैदान, टेनिस मैदान, खो-खोचे मैदान, व्हॉलिबॉल मैदान, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल व व्यायामशाळेची पाहणी करत माहिती घेतली. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक यांनी क्रीडा संकुलातील विविध मैदाने व जलतरण तलावाच्या दुरुस्ती करावयाची असल्याचे सांगितले. यानंतर पालकमंत्री पाटील यांनी मैदाननिहाय, जलतरण तलावाच्या दुरुस्तीसंदर्भात येणाऱ्या खर्चाची माहिती जाणून घेत त्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश क्रीडा अधिकारी कार्यालयास दिले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Balasaheb Patil Held A Review Meeting At The Collectorate Satara News