नेर धरणाचे पाणी रब्बीसाठी त्वरित सोडा : पालकमंत्र्यांचे 'कृष्णा'ला आदेश; शेतकऱ्यांत समाधान

ऋषिकेश पवार
Sunday, 22 November 2020

यंदा दमदार पावसामुळे नेर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील पाणी रब्बी हंगामासाठी वेळेत उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदनाद्वारे केली होती.

विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील नेर धरणाचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्याचे नियोजन आणि त्यासाठी आवश्यक असणारी कॅनॉल दुरुस्ती त्वरित करा, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कृष्णा सिंचन विभागाला दिले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिलेल्या निवेदनानंतर पालकमंत्र्यांनी त्वरित हालचाली केल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील 416 दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या ब्रिटिशकालीन नेर धरणातील पाणी 2636 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी होणे अपेक्षित आहे. मात्र कालवे, पोटकालव्यांचे नुकसान झाल्याने गेल्या काही वर्षांपासून धरणातील पाण्याचा वापर हजार ते बाराशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी होत आहे. यंदा दमदार पावसामुळे नेर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील पाणी रब्बी हंगामासाठी वेळेत उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना शनिवारी दिलेल्या निवेदनाद्वारे केली. 

विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या, तरी महाविकास आघाडी डगमगणार नाही : देसाई

पालकमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत विधाते यांनी नेर धरणातील पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात दर वर्षी दिरंगाई होते. कालवा सल्लागार समितीची बैठक वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी करपल्यानंतर पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते, त्यामुळे शेतकरी पाणी मागणी अर्ज भरण्याला प्रतिसाद देत नाहीत. कृष्णा सिंचन विभागाकडून अपेक्षित अर्ज येण्याची वाट पाहिली जाते. दर वर्षी अशी संदिग्धता राहिल्याने पाणी वेळेवर सोडले जात नाही. सध्या दोन कालव्यांद्वारे भुरकवडी आणि कुरोलीपर्यंत कसेबसे पाणी सोडले जाते. धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाणी सोडण्यापूर्वी दर वर्षी नेर उजवा, डावा आणि मुख्य कालव्यांची दुरुस्ती करावी लागते अशा अडचणी मांडल्या. कालवा सल्लागार समितीची बैठक त्वरित आयोजित करावी, अशी मागणीही त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. दरम्यान, कृष्णा सिंचन विभागाच्या नेर धरण व्यवस्थापनानेही पाणी सोडण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कालवे दुरुस्तीला लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी आज बैठक होणार आहे. 

साताऱ्यात 23 नोव्हेंबरला शाळेची घंटा वाजणार; जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा व्यवस्थापनाला आदेश

पालकमंत्र्यांचा ॲक्शन मोड : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधातेंनी नेर धरणाचे पाणी रब्बी हंगामासाठी त्वरित सोडावे, या मागणीचे निवेदन देताच पालकमंत्री लगेच ॲक्शन मोडमध्ये आले. कृष्णा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करुन त्यांनी धरणाचे पाणी त्वरित सोडण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश दिले. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Guardian Minister Has Ordered To Release Water From Ner Dam For Crops Satara News