Satara : 'उद्यापासून ५० किलोवरील मालाची हाताळणी बंद' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra-Patil

'उद्यापासून ५० किलोवरील मालाची हाताळणी बंद'

ढेबेवाडी : आंतरराष्ट्रीय श्रम संघटना व राज्य शासनाने काढलेला आदेश, तसेच पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंत्रालयातील बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार तातडीने अंमलबजावणी न झाल्यास येत्या गुरुवारपासून (ता. १६) ५० किलोपेक्षा जादा वजनाच्या मालाची माथाडी हाताळणी करणार नाहीत, असा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आज दिला.

नवी मुंबई येथील कांदा- बटाटा मार्केटच्या लिलावगृहात आयोजित माथाडी कामगारांच्या सभेत श्री. पाटील यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले, ‘‘परिपत्रकानुसार मालाचे वजन ५० किलोच ठेवण्याबद्दल महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन, व्यापारी असोसिएशन व बाजार समितीकडे मागणी केली होती. गेल्या एक वर्षापासून या प्रश्नासंदर्भात संयुक्त बैठकाही झाल्या; परंतु चर्चा होऊनसुद्धा पुढे निर्णय व अंमलबजावणी केली जात नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे नवी मुंबई कांदा- बटाटा मार्केट आवारातील माथाडी कामगारांनी १५ नोव्हेंबरपासून आंदोलनही पुकारले होते.

हेही वाचा: ‘एलआयसी’ची धन रेखा योजना बाजारात दाखल

याप्रश्नी मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही ५० किलोच्या गोणीबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मात्र, त्यासंदर्भात संबंधित यंत्रणेने तातडीने अंलबजावणी न केल्यास गुरुवारपासून (ता. १६) ५० किलोंपेक्षा जादा येणाऱ्या मालाची माथाडी कामगार हाताळणी करणार नाहीत.’’ सभेस माथाडी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, सचिव कृष्णा पाटील, अशोक दुधाणे, खजिनदार गुंगा पाटील, कांदा-बटाटा मार्केटमधील कार्यकर्ते शिवाजी बर्गे, पोपट पवार, अरुण शिंगटे, बाळकृष्ण वाशिवले, बबन संकपाळ, राजू जुनघर व कामगार उपस्थित होते.

Web Title: Handling Of 50 Kg Goods Will Be Stopped From Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sataranarendra patil news
go to top