महाबळेश्वर, पांचगणीतील गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

अभिजीत खुरासणे
Wednesday, 18 November 2020

व्यवस्थापनात बदल केल्यास त्याचे किती चांगले परिणाम होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाबळेश्वर येथील ग्रामीण रूग्णालय म्हणता येईल. येथील अनुभव पाहता ज्या ठिकाणी खूप प्रयत्न करूनही आरोग्य सेवा पोहोचविणे कठीण जाते, अशा आदिवासी भागातील ग्रामीण रूग्णालय व त्या अंतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्र, रेडक्राॅस सोसायटी सेवाभावी संस्थेकडे हस्तांतर करण्याचा निर्णय दोन आठवड्यात घेण्यात येईल, अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाबळेश्वर येथे दिली.

महाबळेश्वर (जि. सातारा) : बाजारपेठा, हाॅटेल, रेस्टाॅरंट व मंदिर सुरू झाल्याने लोक आता मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत, परंतु या गर्दीत शिस्त पाळली जात नाही. मला काही होणार नाही असे आता लोकांनी गृहीत धरले आहे. गर्दीत स्वयंशिस्त आवश्यक आहे, अन्यथा ही गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते. म्हणून मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, दिल्ली व केरळ येथे रूग्ण वाढू लागले आहेत. युके, फ्रान्समध्ये लाॅकडाउन लागू करण्यात आला आहे. अमेरिकाही अडचणीत आहे, म्हणून सध्या आपल्या पुढे अडचणी वाढू नये यासाठी लोकांनी शिस्त पाळली पाहिजे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. 

भाऊबीजेचे औचित्य साधून महाबळेश्वर येथे आपल्या कुटुंबासोबत विश्रांतीसाठी आरोग्यमंत्री टोपे हे आले होते. या आपल्या खासगी दौ-यात त्यांनी येथील ग्रामीण रूग्णालयास सदिच्छा भेट दिली. व्यवस्थापनात बदल केल्यास त्याचे किती चांगले परिणाम होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाबळेश्वर येथील ग्रामीण रूग्णालय म्हणता येईल. येथील अनुभव पाहता ज्या ठिकाणी खूप प्रयत्न करूनही आरोग्य सेवा पोहोचविणे कठीण जाते, अशा आदिवासी भागातील ग्रामीण रूग्णालय व त्या अंतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्र, रेडक्राॅस सोसायटी सेवाभावी संस्थेकडे हस्तांतर करण्याचा निर्णय दोन आठवड्यात घेण्यात येईल, अशी माहितीही टोपे यांनी महाबळेश्वर येथे दिली.  

VIDEO : शरद पवारांनंतर काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या रडारवर; आयकरने धाडली नोटीस
          
अलिकडेच राज्य शासनाने येथील ग्रामीण रूग्णालय व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य  केंद्र हे रेडक्राॅस सोसायटी संचालित बेलएअरकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आले आहे. बेलएअर व्यवस्थापनाने या रूग्णालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करून सर्व सुविधा सुसज्ज केल्या आहेत. आरोग्य मंत्री टोपे यांनी या आपल्या भेटीत रूग्णालयाची इमारत तेथील सर्व सुविधा यांची पाहणी केली. रूग्णालयाची इमारत तेथील सुविधा व स्वच्छता पाहून टोपे हे अत्यंत प्रभावित झाले. ग्रामीण रूग्णालय हे खाजगी व्यवस्थापनाकडे देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे समर्थन केले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Minister Rajesh Tope Visited Mahabaleshwar Satara News