माणला शेतकऱ्यांची धांदल; कांदा, बाजरीसह घेवड्याचे मोठे नुकसान

रुपेश कदम
Thursday, 15 October 2020

आजही (गुरुवार) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कृष्णा नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.

दहिवडी (जि. सातारा) : मुसळधार पावसाने माणला झोडपून काढले. आज सकाळपासून संततधार सुरू असल्यामुळे घरातून बाहेर पडणेही अवघड झाले. पावसाने शेतामध्ये पाणी साठले असून, काही पिके कुजली आहेत.
 
शनिवारी दुपारपासून पाऊस पडत आहे. शनिवार, रविवार मुसळधार पाऊस बहुतांशी भागात झाला. म्हसवडपासून शेनवडीपर्यंतच्या पट्ट्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. वावरहिरे, शिंगणापूर, मोही, मार्डी, खुटबाव, भालवडी, राणंद या गावांसह आंधळी, मलवडी, बिजवडी, पाचवड परिसराला पावसाने झोडपले. शिंगणापूर परिसरातही दमदार पावसामुळे परिसरातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असून, पुष्कर तलावही भरून वाहत आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांच्या ताली फुटल्या.

बनावट नंबरप्लेट वापरताय, सावधान! पोलिस आहेत मागावर

ओढे, नाले, बंधारे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. माणच्या बहुतांशी भागात दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने माणगंगा नदीपात्रातील पाण्यातही वाढ झाली असून, आंधळी, पिंगळी, राणंद, जाशी तलावही पूर्ण क्षमतेने भरले आहेत. आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. गाई, जनावरे, शेळ्या-मेंढ्या जागेवरच उभ्या आहेत.

उज्वल भविष्यासाठी शाळा आली अंगणी, विद्यार्थ्यांसाठी झटताहेत शिक्षिका दयाराणी!

सततच्या पावसाने शेतामध्ये पाणी साठले असून, पिके कुजली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली असून, काही ठिकाणी कांदा, बाजरी, घेवडा पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मागील महिन्याभरापासून शेतात वाफसाच आलेला नाही. त्यामुळे पिके काढता आली नसून काहींना पेरणीही करता आली नाही.

दरम्यान आज (गुरुवार) सकाळपासून सातारा जिल्ह्यात पावसाचा जाेर आहे. फलटण येथील बाणगंगा नदीला पूर आल्याने तेथील गणेश मंदिर पाण्याखाली गेले आहे. आजही (गुरुवार) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कृष्णा नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain Caused Loss To Onion Bajri Crops Maan Taluka Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: