सातारच्या पोलिस कोविड सेंटरची गृहमंत्र्यांकडून दखल!

बाळकृष्ण मधाळे
Monday, 14 September 2020

महाराष्ट्रातील पहिल्या पोलीस कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाल्याचा उल्लेख गृहमंत्री देशमुख यांनी व्टिटरव्दारे केला. केवळ पाच दिवसांच्या अल्पावधीत उभारलेले हे 30 बेडचे कोविड केअर सेंटर सातारा जिल्ह्यातील पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात रविवारी 22543 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, तर नवीन 11549 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

सातारा : राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान माजवायला सुरुवात केली असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी अधिकारी कर्मचारी यांनाही होत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पोलिसांसाठी रविवारी कोविड ऑक्सिजन हॉस्पिटल उभारण्यात आले. याचीच दखल घेत रविवारी रात्री व्टिटरव्दारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड ऑक्सिजन हॉस्पिटलचा पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी लाभ होणार असल्याचे म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्रातील पहिल्या पोलीस कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाल्याचाही उल्लेख त्यांनी व्टिटरव्दारे केला. केवळ पाच दिवसांच्या अल्पावधीत उभारलेले हे 30 बेडचे कोविड केअर सेंटर सातारा जिल्ह्यातील पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्यात रविवारी 22543 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, तर नवीन 11549 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण 290344 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता 69.08% झाले आहे. 

एसपींचा पुढाकार, साताऱ्यात पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल साकार!

दरम्यान, सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उच्चांकी 1086 जणांचा अहवाल बाधित आला, तर रविवारी सकाळी आलेल्या अहवालात कोरोना बळींची आलेली 35 संख्या चिंता वाढवणारी ठरली. जिह्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे, तर आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध स्थितीशी संघर्ष करुन कोरोनाविरुध्दचा लढा जिंकावा लागणार आहे. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये 35 बाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे, तर रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालात 266 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, रात्री उशिरा आलेल्या अहवालात 629 एवढ्या जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

बालपण वाचविण्यासाठी धडपणारी चाईल्ड लाइन! 

या पोलिस कोविड हॉस्पिटलचे उद्‌घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाले. या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, हायफ्लो ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, साधारण बेड, एक्स रे मशिन, ईसीजी मशीन, कार्डीयाक ॲम्बुलन्स (२४ तास उपलब्ध) आदी सुविधा असणार आहेत. सद्य परिस्थितीमध्ये 35 बेडची क्षमता असून उपलब्ध बेड संख्येपैकी ५० टक्के बेड हे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता राखीव व ५० टक्के बेड हे नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहेत. दर पंधरा दिवसांनी बेड उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार असून आढाव्याअंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. 

साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चाची झाली गाेपनीय बैठक; आंदोलनाचा पवित्रा

या उद्घाटनप्रसंगी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूर परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण तसेच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh lauded The Police Covid Center In Satara