esakal | मसुरात चक्क विलगीकरणातील लोक रस्त्यावर; संशयितांची कोरोना सेंटरला जाण्यास टाळाटाळ
sakal

बोलून बातमी शोधा

Home Quarantine

मसुरात चक्क विलगीकरणातील लोक रस्त्यावर; संशयितांची कोरोना सेंटरला जाण्यास टाळाटाळ

sakal_logo
By
गजानन गिरी

मसूर (सातारा) : कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, होम क्वारंटाइन (गृह विलगीकरण) असलेले अनेक जण नियमांची पायमल्ली करत बाहेर बिनधास्त फिरत आहेत. अनेक रुग्ण घरात आवश्‍यक सुविधा नसतानाही कोरोना सेंटरला उपचारासाठी जात नाहीत. त्यांच्याकडून होम क्वारंटाइनलाचा पसंती दिली जात असल्याने लोकांच्या बेफिकीर व निष्काळजीपणामुळे कोरोनाची साखळी वाढत चालली आहे. (Home Quarantine Citizens Are Roaming The Streets In Masur Satara News)

हॉटस्पॉट ठरलेल्या ब्रह्मपुरी व अष्टविनायक पेठेसह अन्य भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पथकाने तपासणी मोहीम सुरू ठेवली आहे. अनेक जणांची अॅन्टीजेन तपासणी केल्यानंतर त्यामध्ये 66 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संपूर्ण विभागात मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात 150, तर हेळगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात 60 असा एकूण दोनशेवर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा गेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र डाकवे, महालॅब टेक्‍निशियन अश्विनी जाधव, लॅब टेक्‍निशियन जाधव, एम. पी. डब्ल्यू देशपांडे यांच्यासह सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, सदस्य रमेश जाधव, संग्राम जगदाळे, सुनील जगदाळे, अक्षय कोरे, माजी सरपंच प्रकाश माळी यांच्या सहकार्याने गावात तपासणी सुरू आहे.

काेराेनाचा विस्फाेट : बाप रे! केंद्राच्या यादीत महाराष्ट्रातील दाेन जिल्ह्यांचा समावेश

प्रत्येक पेठेत तपासणी होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनी सांगितले. बाधित रुग्ण हे सह्याद्री कारखान्याच्या इंजिनियरिंग कॉलेजवरील कोरोना सेंटरला उपचारासाठी जाण्यास टाळाटाळ करत आहेत. घरात आवश्‍यक सुविधा नसतानाही क्वारंटाइनसाठी घरीच राहण्याचा आग्रह धरत आहेत. त्यातच होम क्वारंटाइन असलेले अनेक जण नियमांची पायमल्ली करत बाहेर बिनधास्त फिरताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबातल्यांसह अन्य लोकांचा जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण होत आहे. त्यामुळे बाधितांची साखळी वाढत चालली आहे. त्याचा विचार आता प्रशासनाने करून असा निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Home Quarantine Citizens Are Roaming The Streets In Masur Satara News