सातारा : हॉटेलच्या कचऱ्याने उंब्रजकरांचे आरोग्य धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel Garbag

सातारा : हॉटेलच्या कचऱ्याने उंब्रजकरांचे आरोग्य धोक्यात

उंब्रज - उंब्रजसह परिसरात पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत अनेक छोटी-मोठी गावे असून, गावांतील नागरिक, तसेच हॉटेल व्यावसायिकांचा कचरा, प्लॅस्टिक महामार्गालगतच्या गटारात उघड्यावर टाकत आहेत. यामुळे महामार्गालगत कचऱ्याच्या ढीगबरोबरच परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यातून उंब्रजवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महामार्गावरून ये- जा करणाऱ्या वाहनधारकांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत व महामार्ग देखभाल दुरुस्ती विभागाने याकडे दुर्लक्ष होत आहे.

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत अनेक हॉटेल, तसेच अन्य व्यावसायिक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील हॉटेल व्यावसायिक हॉटेलमधील कचरा हा उघड्यावर टाकून देत आहेत. हॉटेलमधील शिल्लक अन्न व कचरा महामार्गालगतच्या गटारात टाकून देत आहेत. त्यामुळे येथे कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. उंब्रजसह परिसरातील महामार्गालगतच्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापन व विघटन व्यवस्था नसल्याने नागरिक गावातील जमा होणारा कचरा महामार्गालगत असणाऱ्या गटारातच टाकत आहेत. उघड्यावर पडलेल्या शिल्लक अन्न व कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारताना दिसत आहेत. दररोज सकाळ, संध्याकाळ व्यायाम करायला जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधी व मोकाट जनावरांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. महामार्गालगत नियमित कचरा टाकणाऱ्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कचरा उघड्यावर टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेली अनेक वर्षे कचऱ्यापासून पसरणाऱ्या दुर्गंधीपासून कधी मुक्ती मिळणार? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित ‍होत आहे. महामार्ग देखभाल दुरुस्ती विभागाकडूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या प्रश्‍नांकडे महामार्ग विभाग लक्ष घालणार असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. कचऱ्याची समस्या आणखी किती वर्षे राहणार? याचे नागरिकांना कोडे पडले आहे.

कचरा विघटनासाठी उपाययोजना हव्यात...

महामार्गालगत असणाऱ्या मोठ्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापन व विघटन करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी अनेक ट्रस्ट व‌ कचरा गोळा करून विल्हेवाट लावणाऱ्या संघटना तयार आहेत. यासाठी प्रशासनाने जनजागृती करून यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Web Title: Hotel Waste Threatens Umbrajkars Health Stench Of Garbage On Highways

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top